Sangli political news | सांगलीत भाजप आक्रमक; काँग्रेस कमिटी समोर प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरून सांगलीत राजकीय वाद पेटला
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्यामुळे सांगलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा निषेध करत भाजपाने शहरात आक्रमक आंदोलन छेडले.
सांगली शहर काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. “शिवरायांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनावेळी भाजपाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकारामुळे सांगलीतील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.