विधानसभा अध्यक्षांवर भाजपचा भ्रष्टाचाराचा आरोप
बेंगळूर : विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. खासदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी सभाध्यक्ष यु. टी. खादर यांच्या कार्यकाळात वाद, गोंधळ आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांची सभाध्यक्षपदावरून मुक्तता करावी, अशी मागणी केली आहे. बेंगळूरमधील राज्य भाजपचे मुख्य कार्यालय ‘जगन्नाथ भवन’मध्ये मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभा अध्यक्षपद आरोपांपासून मुक्त असायला हवे. यासाठी न्यायमूर्तींमार्फत आरोपांसंबंधी चौकशी करावी, अशी मागणी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी केली.
सभाध्यक्ष कार्यालयातील टेंडर केवळ मंगळूरमधील लोकांनाच का मिळत आहेत, असा प्रश्नही त्यांनी याप्रसंगी केला. विधानसभा अध्यक्षांच्या सचिवालयातील अधिकाऱ्यांचे मत काय होते? उपलब्ध माहितीनुसार अर्थखात्याने खरेदीला मंजुरी नाकारली. त्यानंतर अर्थखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच मंजुरी दिल्याचा आरोप आहे. विधानसभेच्या मुख्य दरवाजासाठी रोझवूडच्या लाकडातून नक्षीकाम केलेली चौकट बसविण्यात आली. त्यापासून भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. आमदारांना घड्याळांचे वाटप करण्यात आले. एआय मॉनिटर सिस्टम बसविण्यासाठी बराच खर्च आला. अशा अनेक खर्चांना विरोध होता. तरीसुद्धा त्याकडे कानाडोळ करण्यात आला, असा आरोपही कागेरी यांनी केला.