ओडिशात घोटाळाप्रकरणी बीजेडी नेत्याला अटक
वृत्तसंस्था/भुवनेश्वर
ओडिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवार, 13 मार्च रोजी कोट्यावधी रुपयांच्या कथित खाणकाम आणि वाहतूक घोटाळ्याप्रकरणी बिजू युवा जनता दलाचे राज्य उपाध्यक्ष सौम्य शंकर चक्र उर्फ राजा चक्र यांना अटक केली. अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी राजा चक्र यांनी दाखल केलेली याचिका बुधवारी ओडिशा उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. राजा चक्र यांना ताब्यात घेतल्यानंतर घोटाळ्यातील त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर घोटाळ्यातील सहभाग उघड झाल्यानंतरच अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त डीजीपी विनयतोष मिश्रा यांनी दिली. खनिजसंपन्न असलेल्या केओंझर जिल्ह्यातील गंध मर्दन लोडिंग (जीएमएल) एजन्सी आणि ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या कामकाजात कथित अनियमितता आणि सहकारी संस्थेच्या निधीचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून गुन्हे अन्वेषणच्या आर्थिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी 2025 मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.