बेनकनहळ्ळी न.पं. चा अजब कारभार
कचरा उचल करण्यापूर्वीच फी वसुली : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
बेळगाव : घंटागाडीच्या माध्यमातून कचऱ्याची उचल करण्यापूर्वीच बेनकनहळ्ळी नगरपंचायतीकडून घरपट्टीसोबत सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट फी भरून घेतली जात आहे. यासोबतच अतिरिक्त 50 रुपये आकारले जात असून, पैसे भरलेली पावती दिली जात नाही, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचा दर्जा वाढविण्यात आला असून, नगरपंचायत म्हणून दर्जा देण्यात आला आहे. पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपूर, बेनकनहळ्ळी आणि सावगाव गावातील कचऱ्याची उचल केली जात नाही. त्यामुळे नागरिक स्वत:हूनच कचऱ्याची विल्हेवाट लावतात. मात्र नगरपंचायतीकडून सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट फी म्हणून प्रतीमहिना 70 रुपये प्रमाणे वर्षासाठी 840 रुपये भरून घेतले जात आहेत. घंटागाडीद्वारे कचऱ्याची उचल होत नसतानादेखील कचऱ्याची फी आकारली जात असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबत कोणीही विचार न करता घरपट्टीमध्ये वाढवून दिलेली अतिरिक्त रक्कम भरत आहेत. तर यासोबत अतिरिक्त 50 रुपये स्वीकारले जात असून, त्याची पावती दिली जात नाही. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
कचरा समस्या लवकरच दूर होणार
नगरपंचायतीकडून कचऱ्याची उचल करण्यासाठी एकूण 5 वाहने तैनात करण्यात आली आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्याने भरतीसाठी निविदा मागविली आहे. एकूण 20 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून, सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर कचऱ्याची उचल केली जात आहे. लवकरच पूर्ण प्रमाणात वाहने कार्यरत होणार असून कचऱ्याची समस्या दूर होणार आहे.
-हालेश सुलेन्नावर, मुख्याधिकारी बेनकनहळ्ळी नगरपंचायत.