Satara : बिल्डर चिंचकर यांची भेट घेणारा 'तो' नेता कोण?, MLA महेश शिंदेंचा सवाल
200 कोटीचे ड्रग सापडले म्हणून बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केली, की त्यांची हत्या?
सातारा : माझ्या मतदारसंघातील बिचुकले गावची निष्पाप पोरं नवी मुंबईत ड्रग प्रकरणात नाहक अडकली आहेत. ती पोरं कष्ट करणारी आहेत. त्यांची नावे आली आहेत. नवी मुंबईत 200 कोटीचे ड्रग सापडले म्हणून. बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केली, की त्यांची हत्या? त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना जे पत्र लिहिले आहे, त्यात एका नेत्याने दहा कोटींची ऑफर दिली होती. तो नेता कोण? गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा नवीन चिंचकर हा लंडनला शिकायला होता. त्याच्यासोबत कोणत्या नेत्याचा मुलगा शिकायला होता.
बिचुकलेच्या मुलांची नवीन चिंचकर याच्याशी भेट कोणी घडवून दिली, याचा सर्व तपास पोलिसांनी केला पाहिजे, अशी मागणी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केली. साताऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबईत 200 कोटींचे ड्रग सापडल्याची बातमी आली होती. त्यात माझ्या मतदारसंघातले बिचुकले गावचे तरुण अडकलेले आहेत. ही बाब गंभीर आहे. मी हे प्रकरण सगळे पाहिले आहे.
बिचुकले गावाला भेट दिली आहे. या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. ज्या तरुणांना प्रमुख आरोपी केलेले आहे. ते सामान्य गोरगरीब घरातील कष्टकरी पोरं आहेत. कष्टकरी पोरं 200 कोटींचे ड्रग आणू शकत नाहीत हे सत्य आहे. आणि त्यांना प्रमुख आरोपी केले आहे. गावचा उपसरपंच शरद पवार गटाचा कोरेगाव तालुकाध्यक्ष सिद्धेश पवार आता फरार आहे. या मुलांना कसली आसपेस नाही. मॅच्युरिटी नाही. 200 कोटींचे ड्रग आणूच कसे शकतात? परवा अभ्यास करून सभागृहात प्रश्न मांडला आहे. साध्या गावात 200 कोटी ड्रगचे सूत्रधार तयार होत असतील तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने गांभीर्याने घेतले पाहिजे.
माझ्यावर मध्येच काही लोकांनी टीका केली होती. पण काल एक बातमी आली. बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी गोळ्या झाडून घेण्यापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. चिंचकर यांनी 9 एमएमच्या पिस्टलमधून गोळी झाडून घेतली. गुरुनाथ चिंचकरांचा मुलगा नवीन चिंचकर हा 2012 मध्ये लंडनला शिकायला होता. लंडनला शिकताना त्याला त्याच्याबरोबरच्या लोकांची संगत लागली. त्यात तो अडकला. त्यावरून नवीनला कुटुंबीयांनी समजावले होते, असे त्या पत्रात गांभीर्याने म्हटले आहे. तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहिती नाही. परंतु तो वाईट विश्वात अडकला गेला.
मुलामुळे मला वाईट अनुभव आले. पोलिसांनी त्रास दिला. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्रास दिला. काही नेते मला भेटले आणि त्या नेत्यांनी आज मला दहा कोटींची ऑफर दिली. तुमचे नाव काढून टाकतो. फार मोठा आरोप झाला आहे. असा कुठला नेता आहे, ज्याचा मुलगा लंडनला शिकायला होता, ज्या नेत्याने बिचुकलेची पोरं नवीन मुंबईत माथाडीसाठी नेली आणि त्यांना ड्रग्जमध्ये गुंतवले. असा कोणता नेता आहे ज्याचे चिंचकर यांच्याशी संबंध आहेत. 9 एमएम पिस्टलची पब्लिकला परवानगी नसते. तरीही गुरुनाथ चिंचकर यांच्याकडे हे पिस्टल आले कुठून? नार्कोटिक्सचे अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांनी हे का शोधले नाही? चिंचकर कोणाचे नाव घेणार नाही ना म्हणून त्यांची हत्या तर झाली नाही ना, की त्यांच्यावर दबाव टाकून आत्महत्या करायला लावली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.नवी मुंबईत 16.8 किलो कोकेन सापडले.
त्याचे खापर निष्पाप पोरांच्या नावावर फोडले. बिचुकले गावात केंद्रीय तपास यंत्रणा चौकशीला येतात. सातत्याने चौकशी होते. अजूनही फरार सिद्धेश पवार सापडत नाही. त्याला लपवून ठेवला की आंधळे सारखाच त्याचाही खून केला, हे आम्हाला माहिती नाही. चिंचकरला कुठले नेते भेटले, त्यांचे सगळे व्हॉट्सअप, फेसबुक, सगळे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी निष्पाप लोकं अडकता कामा नये असे लिहिले आहे. राज्य सरकारने प्रचंड गांभीर्याने पाहिले पाहिजे. या प्रकरणाच्या तळाशी जाऊन कसल्याही परिस्थितीत दोषींना शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला.
मुलांना ड्रग्जचे वेड कुणी लावलं?
कोलवडीतल्या ज्या मुलीचा अपघात झाला, ज्या मुलांनी ज्या गाडीने उडवले, त्या दोन मुलांनी ड्रग्ज घेतले होते. छोट्या गाड्या घेऊन बाहेर पाठवले जायचे. ट्रीपला जायचे म्हणून पाठवायचे. त्या मुलांनी जबाबात जरी ड्रग्ज घेतले नव्हते असे सांगितले असले तरीही त्यांचे सीसीटीव्हीचे फुटेज बघा, असा खळबळजनक दावाही आमदार महेश शिंदे यांनी केला.