पुर्येत विहिरीत पडून गव्याचा मृत्यू
साखरपा :
संगमेश्वर तालुक्यातील पुर्येतर्फे देवळे खालचीवाडी येथे विहिरीत पडलेल्या गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
पाण्याचा व गव्याच्या आवाजाने शेजारील ग्रामस्थ जमा झाले होते. त्यानंतर वनविभागाला घटनेची खबर देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची उंची सुमारे 30 फूट होती व पाणी 10 ते 12 फूट होते. त्यामुळे तो काही काळ पाण्यावर तरंगत होता. पुर्ये खालचीवाडी व परिसरातील नागरिक वनविभागाच्या मदतीला होते. त्याचबरोबर पोलीस खात्याचे कर्मचारीही त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र काही काळानंतर थकल्याने व वरती तरंगू न शकल्याने तो रात्री 10च्या दरम्यान गवा पाण्यात बुडाला व मरण पावल्याचे वनविभाग यांच्यावतीने सांगण्यात आले. त्यानंतर एवढ्या जड वजनाच्या गव्याला बाहेर काढणे कठीण काम होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व हायवे कंपनीच्या क्रेनने मोठ्या जिकरीने त्याला बाहेर काढण्यात आले.