Bison Attack Kolhapur: गव्याच्या हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, कुदळवाडीतील घटना
एका गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत जोरदार धडक दिली
By : महेश तिरावडे
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील आपटाळपैकी कुदळवाडी येथे आज सकाळी गव्याच्या हल्ल्यात ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी भिकाजी गुंडू बेरकळ (वय ५९) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिकाजी बेरकळ हे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कडका येथील पाण्याच्या ठिकाणी गावाला पाणी सोडण्यासाठी गेले होते.
यावेळी दबा धरून बसलेल्या एका गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बेरकळ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचत पाहणी केली. दरम्यान, बेरकळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
भिकाजी बेरकळ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास वनक्षेत्रपाल विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संग्राम जितकर, वनरक्षक मनीषा रायकर आणि वनमजूर जैनुल जमादार हे करत आहेत. मृताच्या नातेवाईकांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.