...आणि पिल्लं झेपावली अथांग सागराकडे! गुहागरमध्ये नवजात कासवांच्या पिल्लांच्या जन्मोत्सवास सुरुवात!
गुहागर /प्रतिनिधी
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रीडले जातीच्या नवजात कासव पिल्लांच्या जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे वनविभागाने गुहागर समुद्रकिनाऱ्यावर बाग व वरचा पाठ येथे संरक्षित केलेल्या कासव अंड्यामधून मंगळवारी बाहेर पडलेल्या तब्बल 103 नवजात कासव पिल्ले गुहागर समुद्रामध्ये सुरक्षितपणे सोडून देण्यात आले आहेत.
गतवर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात सर्वाधिक कासव संवर्धनाची मोहीम गुहागर समुद्रकिनाऱ्यावर राबविण्यात येत आहे परिमंडल वन अधिकारी गुहागर चे वनपाल संतोष परशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुडंगे कासव संरक्षणाचे काम पाहत आहेत गुहागर समुद्रकिनाऱ्यावर एकूण सहा कासव मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे गतवर्षी नोव्हेंबर 2022 महिन्यापासून कासव अंडी मिळू लागली होती परंतु यावर्षी वादळ सदृश्य परिस्थितीमुळे कासवांच्या विणिंचा हंगाम लांबविला आणि 16 डिसेंबर 2023 पासून पहिले कासव अंड्यांचे घरटे मिळून आले. गुहागर शहरातील सहा किलोमीटर लांबीच्या या समुद्रकिनाऱ्यावर मानव हस्तक्षेप कमी असल्याने व शांतता असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हरीडले जातीचे कासव अंडी घालावयास येतात. समुद्रकिनाऱ्यावर बाग व वरचा पार्ट या ठिकाणी कासव अंडी संवर्धन केंद्र उभारण्यात आली असून यामध्ये आतापर्यंत 100 घरट्यामध्ये 10538 कासव अंड्यांना संरक्षण देण्यात आले आहे साधारण 45 ते 60 दिवसांमध्ये अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. त्याप्रमाणे 4 फेब्रुवारीपासून संरक्षित केलेल्या अंड्यामधून कासव पिल्लांचा जन्मास सुरुवात झाली आहे. रविवारी 1, सोमवारी 4 तर मंगळवारी 103 कासव पिल्ले अंड्यातून बाहेर पडल्यावर वनविभागाने या सर्व पिल्लांना गुहागर समुद्रामध्ये सुरक्षितपणे सोडून दिले.
यावेळी वनपाल संतोष परशेटे, वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुंडगे, उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पत्रकार सत्यवान घाडे, श्रीधर बागकर, कासव मित्र रवींद्र बागकर, कुसुमाकर बागकर आदी उपस्थित होते. अंड्यातून बाहेर पडतात समुद्राच्या लाटांचा आवाज व त्याच्या कंपनाच्या दिशेने झेपावणाऱ्या या नवजात पिल्लांचे मनमोहक दृश्य मंगळवारी पहावयास मिळाले यामुळे यावर्षीही मोठ्या प्रमाणावर गुहागर समुद्रावरून नवजात कासव पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात येतील असा विश्वास वनपाल संतोष परशेटे यांनी व्यक्त केला.
गतवर्षी गुहागर समुद्रकिनाऱ्यावर 219 गटामधून 23073 अंड्यांना संरक्षण देण्यात आले होते त्यामधून 7068 कासव पिल्लांचा जन्म झाला होता तर तवसाळ मधून मिळून आलेल्या 28 घरट्यांमधून 3239 अंड्यांना संरक्षण देत 1704 कासव पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली गतवर्षी सर्वाधिक 26312 अंड्यांना संरक्षण देऊन त्यामधून 8772 कासव पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली आहेत दरवर्षी कासव विणिंच्या संख्येत वाढ होत आहे वेळास मध्ये सन 2002 पासून तर गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सन 2012 पासून कासव संवर्धनाची मोहीम अधिक व्यापक पणे चालवली जात आहे परिणामी भविष्यात मोठ्या प्रमाणावर कासव संवर्धनाची मोहीम कोकणच्या किनारपट्टीवर राबवली जाईल गतवर्षी गुहागर समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना कासव महोत्सवाच्या माध्यमातून नवजात पिल्ले समुद्रामध्ये सोडतानाचे मनमोहक दृश्य पाहता आले होते यावर्षीही पर्यटकांना ही नवजात पिल्ले समुद्रामध्ये सोडतानाचे दृश्य पाहता यावे याकरताचे नियोजन करण्याचा प्रयत्न वनविभाग करणार असल्याची माहिती वनपाल संतोष परशेटे यांनी दिली.