For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिर्ला यांनी घेतली रहमान यांची भेट

06:23 AM Feb 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिर्ला यांनी घेतली रहमान यांची भेट
Advertisement

सोपविले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली, ढाका

भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बांगला देशचे नवनियुक्त नेते तारिक रहमान यांची भेट घेतली आहे. रहमान यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांनी त्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांच्याजवळ दिलेले पत्र त्यांनी रहमान यांना सुपूर्द केले. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रहमान यांची बांगला देशाच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

Advertisement

बांगला देशचे भारतातील उच्चायुक्त रियाझ हमीदुल्लाह यांनीही यासंबंधी ‘एक्स’वर एक संदेश प्रसारित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेले पत्र तारिक रहमान यांच्यापर्यंत पोहचले असून रहमान यांनी त्यांचे आभार मानले आहेत. रहमान यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत, असे या संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. रहमान यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगला देश यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असे सर्वसाधारण मत व्यक्त केले जात आहे.

भारतभेटीचे निमंत्रण

बिर्ला यांनी रहमान यांची भेट घेऊन समस्त भारतीयांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्यांना भारताला भेट देण्यासंबंधी निमंत्रणही दिले आहे. भविष्यात एकमेकांशी सहकार्य करण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला असून आर्थिक प्रगतीच्या दिशेने एकमेकांच्या साहाय्याने वाटचाल करण्याचीही इच्छा दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. रहमान यांच्या सत्ताग्रहणानंतर बांगला देशात शांतता निर्माण होईल आणि त्या देशातील अल्पसंख्याकांच्या विरोधातील, विशेषत: हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार थांबेल, अशी भारताची अपेक्षा आहे.

पंतप्रधान मोदी यांनाही निमंत्रण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण, बांगला देशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांच्याकडून देण्यात आले. तथापि, मंगळवारीच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात आलेले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे त्यांची भेट घेतली. हा कार्यक्रम पूर्वनिर्धारित असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी रहमान यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी पत्राद्वारे आपल्या शुभेच्छा पाठविल्या आहेत. बांगला देशात आता नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे, अशी प्रतिक्रिया जगातील अनेक नेत्यांनीं व्यक्त केली आहे.

विक्रम मिस्त्रीही उपस्थित

रहमान यांच्या शपथविधी कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व ओम बिर्ला यांनी केले. त्यांच्यासमवेत भारताच्या परराष्ट्र विभागाचे मुख्य सचिव विक्रम मिस्त्री यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. बांगला देशात नवे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर भारताने या सरकारशी प्रथम संपर्क केला असून भविष्यात परस्पर सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमध्ये वादाचे अनेक मुद्दे आहेत. मात्र, ते टाळण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून केला जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.