Birdev Done: जिल्हा परिषदची मराठी शाळा... अधिकारी घडवणारी खाण!
यशामध्ये यमगे शाळेतील सातवीपर्यंत वर्गशिक्षिका असणाऱ्या शीला जाधव यांचेही मोलाचे योगदान आहे.
By : कृष्णात चौगले
कोल्हापूर : कागल तालुक्यातील यमगे येथील धनगर समाजातील, एका सामान्य कुटुंबातील मुलगा आयपीएस अधिकारी झाला आणि सर्वांनाच भरभरून आनंद झाला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते हे बिरू डोणे या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण केंद्रशाळा यमगे येथे झाले. त्यांच्या या यशामध्ये यमगे शाळेतील सातवीपर्यंत वर्गशिक्षिका असणाऱ्या शीला जाधव यांचेही मोलाचे योगदान असल्याचे स्वत: बिरू यांनी सांगितले.
एवढे मोठे यश मिळवण्यासाठी मुलाला मोठमोठ्या क्लासेस मध्येच घालावे लागते. किंवा त्याना इंग्लिश मीडियम मधूनच शिकावे लागते, हा समज बिरू डोणे यांनी खोटा ठरवला आहे. त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण हे केंद्रशाळा यमगे येथे झाले. या विद्यार्थ्याला पाचवी ते सातवी पर्यंत वर्गशिक्षिका असणाऱ्या शीला जाधव यांचेही नाव या निमित्ताने चर्चेत आले. बिरू यांनी आपल्या यशाचे श्रेय देताना या आपल्या वर्गशिक्षिकेचाही उल्लेख केला आहे. ही बाब तमाम प्राथमिक शिक्षकांना अभिमान वाटावी अशीच आहे.
प्राथमिक शाळेत गुणवत्तेला वाव मिळत नाही असे म्हणणाऱ्यांना ही जोरदार चपराक आहे. झोपडीत राहणारी रानावनात फिरणारी गुणवत्ता जिद्दीच्या जोरावर काय करू शकते, याचे उदाहरण बिरू डोणे यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मेंढपाळाचा व्यवसाय करत त्यांनी मिळवलेले हे यश स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेगावात जि.प.ची शाळा होती म्हणून शिक्षण बिरदेव सिध्दप्पा डोणे यांनी केंद्रशाळा विद्या मंदिर यमगे येथे सन 2005 रोजी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला.
मूळातच अभ्यासात हुशार असणारा बिरदेव जिद्दीही होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सन 2005 ते 2011 पर्यंत इयत्ता पहिली ते सातवी गावातील याच शाळेत पूर्ण केले. खास करुन त्यांना शिकवणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांची नावे आजही त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांनी विशेष करून शीला जाधव, भोई, मोरे आणि शिंगे मॅडम यांचा बोलताना उल्लेख केला. फक्त गावात जिल्हा परिषदची शाळा होती म्हणून मी शिक्षण घेऊ शकलो, अशी भावना बिरदेव यांनी व्यक्त केली. जि.प.शाळेत गुणवत्ता हेरून प्रेरणा दिली जाते. आज जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी उच्चपदस्थ झेप घेतो हे प्रभावीपणे नजरेत भरणारे आहे.
विशेष म्हणजे पाचवी सहावी आणि सातवीत असताना वर्गशिक्षिका म्हणून लाभलेल्या शिला जाधव यांनी त्याला त्यावेळेला तू मोठा अधिकारी होऊ शकतोस, तुझ्याकडे गुणवत्ता आहे हा त्याच्यामध्ये भरलेला आत्मविश्वास आज बिरूला यशाच्या शिखरावर घेऊन गेला आहे. प्राथमिक शाळेत गुणवत्ता हेरली जाते, त्याला प्रेरणा दिली जाते. याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
उच्चपदस्थ अधिकारी जि. प. शाळेतून शिक्षण घेतलेलेउच्चपदस्थ अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवणारे बहुतांश अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत. कोल्हापूर जिह्यातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान माणसे ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली आहेत. या सर्वांनीच प्राथमिक शाळेमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या यादीत आज एका सामान्य कुटुंबातील बिरू डोणे यांचाही समावेश झालेला आहे. ही बाब जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये असणाऱ्या गुणवत्तेला अधोरेखित करणारी आहे.
जिल्हा परिषदेकडून बिरू डोणेंचे कौतुकसंपूर्ण देशामध्ये 551 रँकने आयपीएस झालेल्या बिरू डोणे यांनी आपल्या यशातील प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचे अभिमानाने ऋण व्यक्त केले. बिरु डोणेंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, कागल गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.