कोल्हापूरी फेटा, धनगरी ढोल अन् लेझीम, Birdev Done यांचे मूळ गावी जल्लोषी स्वागत
ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मुरगुडपासून यमगेपर्यंत बिरदेव डोणे याची मिरवणूक काढली
कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला कोल्हापूरचा बिरदेव डोणे आज त्याच्या मूळ गावी म्हणजे कागल तालुक्यातील यमगे या ठिकाणी पोहोचला. यावेळी ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मुरगुडपासून यमगेपर्यंत बिरदेव डोणे याची मिरवणूक काढली. कोल्हापुरी फेटा बांधून गावकऱ्यांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या जंगी मिरवणूकीत धनगरी ढोल, लेझीम, झांज पथकाचा देखील देखील समावेश होता.
काही तासांसाठी हा परिसर एकदम जल्लोषी वातावरणाचा पाहायला मिळाले. गावकऱ्यांनी बिरदेव यांच्या मिरवणूकीच्या गाडीवर फुलांची उधळण केली. अनेक महिलांनी औक्षण करुन कौतुक केलं. यावेळी सोबत त्यांचे सर्व कुटुंबिय उपस्थित होते. यूपीएससीमध्ये यश मिळवल्यानंतर पहिल्यांदाच बिरदेव आपल्या मूळ गावी आल्याने आई-वडिलांसोबत त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो नागरिक या मिरवणुकीमध्ये बिरदेवच कौतुक करण्यासाठी सहभागी झाले होते.
यूपीएससीचा निकाल लागल्यापासून सोशल मिडीयावर त्यांचे बरेच फोटो, मुलाखती, व्हिडीओ व्हायरल झाले. बिरदेव अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचा पारंपरिक मेंढपाळाचा व्यवसाय ते मोठ्या आवडीने सांभाळतात. त्यांना परीक्षेचा निकाल समजला तेव्हा ते फिरतीवर होते. त्याचवेळी हातात कोकरु घेतलेला सुंदर फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. आज ते मूळ गावी आल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही बिरदेव यांनी जिद्द सोडली नाही. दरम्यानच, त्यांची नेव्हीत निवड झाली. पोस्टामध्येही नोकरी मिळाली होती. पण युपीएससी खुणावत होती. म्हणून त्यांनी दिल्ली गाठली. तेथे अभ्यास करून परीक्षा दिली. पण यश मिळाले नाही. नंतर पुण्यामध्ये त्यांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. 2024 च्या युपीएससीच्या परीक्षेत यश संपादन करायचे या जिद्दीने तयारी केली.
या कष्टाचा निकाल जाहीर झाला आणि बिरदेव 551व्या रँकने उत्तीर्ण झाले. संपूर्ण यमगे, मुरगूडसह तालुका, जिल्हा नव्हे तर राज्यभर किंवा देशांमध्ये बिरदेव यांच्या यशाचे कौतुक सुरू झाले. पाहता पाहता प्रत्येक तरुणांच्या डीपी, स्टेट्सवर बिरदेव झळकू लागले. हा निकाल जाहीर झाला तेव्हा ते मामांच्या बकऱ्यात लोकर कातरत होते. त्यांचा हा साधेपणा आजच्या तरुणाला आदर्शवत वाटला आणि भावला देखील त्यामुळे सध्या तरुणही त्यांच्याकडे आयडॉल म्हणून पाहत आहेत.