Birdev Done: कीर्तनकारांच्या कीर्तनातही IPS डोणे यांच्या यशाचं कौतुक, तरुणांसाठी आयडॉल!
रविवारी सकाळी आठ वाजता बिरदेव यांची मुरगूड येथून भव्य मिरवणूक यमगे गावापर्यंत निघणार आहे
By : सदाशिव आंबोशे
सेनापती कापशी : काल-परवापर्यंत सामान्य म्हणून वावरत असलेल्या बिरदेव डोणेने यूपीएससीत लख्ख यश मिळवले. या यशाने एका मेंढपाळाचा पोरगा उच्च पदस्थ अधिकारी झाला. याचा आनंद यमगे गावासह तालुक्याला झाला. पण प्रत्येकाला आपल्याच घरातीलच जणू कोणी हे यश खेचुन आणले, अशी भावना दिसून येते. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. मुळातच या सर्वापासून दूर असलेले बिरदेव यांची चर्चा सर्वच मीडियात होत आहे.
युपीएससीचा निकाल लागला आणि प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बिरदेव डोणे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव झाला. तालुक्यातील प्रत्येक घरात त्यांच्या यशाची चर्चा होत आहे. अनेक कीर्तनकारांच्या कीर्तनातही त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे. रविवारी सकाळी आठ वाजता बिरदेव यांची मुरगूड येथून भव्य मिरवणूक यमगे गावापर्यंत निघणार आहे. बिरदेव अगदी सामान्य कुटुंबातील. त्यांचा पारंपरिक मेंढपाळाचा व्यवसाय ते सांभाळतात. हे कुटुंब कायम राणामाळातून, काट्याकुट्या तुडवत भटकत असतात.
शिक्षण तसे या कुटुंबात कमीच असते. बिरदेव यांचे वडिल सिध्दाप्पा डोणे मात्र थोडे शिकलेले. परंतु बिरदेव यांनी मात्र शिक्षणाला वाहून घेतले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येमगेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. दहावी, बारावीच्या परीक्षेत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा मान त्यांनी मिळवला. दहावीला 96, बारावी सायन्सला 89 टक्के गुण मिळाल्याने त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली.
आर्थिक परिस्थिती बिकट असली तरीही बिरदेव यांनी जिद्द सोडली नाही. दरम्यानच, त्यांची नेव्हीत निवड झाली. पोस्टामध्येही नोकरी मिळाली होती. पण युपीएससी खुणावत होती. म्हणून त्यांनी दिल्ली गाठली. तेथे अभ्यास करून परीक्षा दिली. पण यश मिळाले नाही. नंतर पुण्यामध्ये त्यांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. 2024 च्या युपीएससीच्या परीक्षेत यश संपादन करायचे या जिद्दीने तयारी केली.
या कष्टाचा निकाल जाहीर झाला आणि बिरदेव 551व्या रँकने उत्तीर्ण झाले. संपूर्ण यमगे, मुरगूडसह तालुका, जिल्हा नव्हे तर राज्यभर किंवा देशांमध्ये बिरदेव यांच्या यशाचे कौतुक सुरू झाले. पाहता पाहता प्रत्येक तरुणांच्या डीपी, स्टेट्सवर बिरदेव झळकू लागले. हा निकाल जाहीर झाला तेव्हा ते मामांच्या बकऱ्यात लोकर कातरत होते. त्यांचा हा साधेपणा आजच्या तरुणाला आदर्शवत वाटला आणि भावला देखील.
तक्रार घेण्यास नकार थेट सत्कारासाठी आमंत्रण
यूपीसीसीचा निकाल लागला त्या दिवशी बिरदेव यांचा मोबाईल चोरीस गेला होता. याची तक्रार देण्यासाठी ते जवळच्या पोलीस ठाण्यात गेले. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. काही वेळातच युपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि त्यांची काही वृत्त वाहिन्यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी हा प्रसंग सांगितला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर हुमेद यांनी तत्काळ त्यांना निमंत्रण देऊन आपल्या कार्यालयात सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मोठ्या भावाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न
"बिरदेव यांचे मोठे भाऊ सध्या सैन्यात सेवा बजावत आहेत. त्यांच्यामुळे माझ्या शिक्षणासाठी मदत झाली. खरेतर त्यांना पीएसआय व्हायचे होते. पण परिस्थिती अभावी ते सैन्यात गेले. सैन्यातील सेवा संपवून आल्यानंतर त्यांना पीएसआय करण्यासाठी आपण सहकार्य करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करु."
- बिरदेव डोण