तीन जिल्ह्यांत बर्ड फ्लू
एच5 एन1 विषाणूमुळे कोंबड्या दगावल्या : भोपाळमधील प्रयोगशाळेच्या नमुने तपासणीतून स्पष्ट
प्रतिनिधी/ बेंगळूर
बळ्ळारी, चिक्कबळ्ळापूर आणि रायचूर जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू प्रकरणे आढळल्यानंतर आरोग्य खात्याने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. रायचूर जिल्ह्यातील मान्वी तालुक्यात, चिक्कबळ्ळापूर तालुक्यात आणि बळ्ळरीच्या संडूर तालुक्यात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू (एच5 एन1 एव्हियन इन्फ्लूएंझा) आढळून आला असून अनेक कोंबड्या दगावल्या आहेत. तथापि, राज्यात आतापर्यंत मानवामध्ये बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. पशुसंगोपन खात्याने मृत कोंबड्यांचे नमुने गोळा करून भोपाळमधील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवले होते. चाचणीदरम्यान, कोंबड्यांचा मृत्यू एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे झाल्याची पुष्टी झाली आहे, असे आरोग्य खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
चिक्कबळ्ळापूर जिल्हा केंद्रापासून केवळ 4 कि. मी. अंतरावर असलेल्या वरदहळ्ळी या गावात काही दिवसांपूर्वी अचानक 35 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांचे नमुने भोपाळ आणि बेंगळूरमधील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. तेथून अहवाल आला असून बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती चिक्कबळ्ळापूर जिल्हा आयोग्य अधिकारी डॉ. महेश यांनी दिली.
बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंगोपन खात्याने बर्ड फ्लूची प्रकरणे आढळलेल्या ठिकाणापासून 3 कि. मी. परिक्षेत्रात कोंबड्यांची सामूहिक कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य आणि पशुसंगोपन खात्याने संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्याचे आश्वासन दिले. आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने या राज्यातून कर्नाटकात वाहतूक होणाऱ्या पोल्ट्रीसंबंधीत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहेत.