For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतातील जैवविविधता : समस्या आणि उपाय

06:17 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतातील जैवविविधता   समस्या आणि उपाय
Advertisement

भारत हा जगातील अग्रक्रमांकाचा वैविध्यपूर्ण देश आहे. हे वैविध्य केवळ माणसे, संस्कृती, भाषा आणि परंपरांपुरते मर्यादित नाही, तर त्यात विविध वनस्पती, प्राणीसृष्टी, सूक्ष्मजीवांसह एकूण जैवविविधतेचाही समावेश होतो. झाडे, प्राणी आणि परिसंस्था यांची समृद्ध विविधता जोपासणाऱ्या जगातील अनेक विपुलता संपन्न देशांपैकी भारत हा एक देश आहे. तथापि, अधिवासाचा ऱ्हास, अमर्याद वापर, प्रदूषण, परिसंस्थेबाहेरील आक्रमक प्रजाती आणि हवामान बदल यामुळे ही निसर्गदत्त व्यवस्था धोक्यात येत आहे. यामुळे परिसंस्थेचा समतोल, पर्यावरणीय सेवांचे रक्षण, प्रजातींचे संवर्धन याद्वारे भावी पिढ्यांसाठी जैवविविधतेचे रक्षण हे अत्यावश्यक कार्य बनले आहे.

Advertisement

भारतासारख्या देशात भौगोलिक विविधता या विस्मयकारक जैवविविधतेचा पाया बनून राहिली आहे. विस्तीर्ण पर्वतरांगा, सरोवरे, वाळवंटे, समशितोष्ण वनप्रदेश, उष्णकटिबंधीय वर्षावने, खाड्या, गवताळ प्रदेश, बर्फाच्छादित शिखरे, प्रवाळ बेटे, अल्पाइन वनस्पती आणि हजारो किलोमीटर लांब पसरलेल्या किनारपट्टीलगतच्या अथांग समुद्रातील सागरी संपत्ती अशी विलोभनीय विरोधाभासी विविधता जगात इतरत्र दुर्मीळ आहे. एका बाजूस राजस्थानची कोरडी व उजाड वाळवंटे आहेत तर दुसऱ्या बाजूस लेहमधील शीतल वाळवंट आहे. केरळच्या सायलेंट व्हॅलीमधील सौंदर्यशाली वर्षावने एकीकडे तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशातील घनदाट अस्पर्शित जंगलप्रदेश जिथे वनराई इतकी दाट की, सूर्यप्रकाशास जमिनीपर्यंत पोहचण्यासाठी प्रयास करावे लागतात. ओरिसामधील 1100 चौरस कि.मी. मध्ये पसरलेले नयनरम्य चिल्का सरोवर जे जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते. ते हजारो लोकांच्या उपजिविकेला आधार देण्यासोबतच असंख्य सागरी जीवांना आधार देते. सुक्ष्मजीवांच्या व्याप्तीचे मूल्यांकन तर अजून झालेले नाही. पश्चिम बंगालमधील सुंदरबन, अंदमानातील प्रवाळ, कच्छच्या रणातील वाळवंट यांच्या वेगळेपणाची महती वर्णावी तितकी थोडीच आहे.

भारतातील जैवविविधतेचा आवाका

Advertisement

पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.4 टक्के क्षेत्रफळ असूनही, जगात नोंद झालेल्या प्रजातींपैकी 7 ते 8 टक्के प्रजाती भारतात आढळतात. जगातील 17 मोठ्या जैवविविध देशांपैकी एक म्हणून भारत आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येसह 96 हजार प्राणी प्रजाती, 47 हजार वनस्पती प्रजाती आणि जगातील जवळपास निम्म्या जल वनस्पतींचे घर आहे. भारतात जगातील सर्वात मोठ्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक क्षेत्र जाळे आहे. येथील वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने सुमारे 1,12,274 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतात. भारतात कृषी जैवविविधतेचीही विलक्षण संपन्नता आहे. रोजच्या अन्नातील तांदळाच्या 30 हजार ते 50 हजार जाती, ज्वारीच्या 5 हजारांहून अधिक जाती, आंब्यांच्या हजारभर तर मिरीच्या तब्बल पाचशे जातींचे हा देश उगमस्थान मानला जातो. अगदी मोजकेच देश या बाबतीत भारताच्या जवळपास फिरकू शकतात. जागतिक कृषी योगदानाच्या बाबतीत भारताचा सातवा क्रमांक लागतो.

आपले पूर्वज आणि जैवविविधता

‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व आपल्या पूर्वजांनी कृतीशील पद्धतीने अवगत केले होते. शेकडो वर्षांपूर्वी त्यांना ही दूरदृष्टी होती की जर त्यांनी काही कल्पक मार्ग शोधला नाही तर वनस्पती, वृक्षवल्ली आणि प्राण्यांच्या महत्त्वपूर्ण प्रजाती नष्ट होतील. त्यांनी काही क्षेत्रांना साक्षात देवाचा अधिवास असलेल्या पवित्र वनराई म्हणून घोषित केले. ही कल्पकता जैवविविधतेचे संरक्षण करण्यात कमालीची यशस्वी ठरली. कोकण पट्ट्यात असे अस्पर्श वनप्रदेश ‘देवराई’ म्हणून ओळखले जातात. झाडे आणि वनस्पतीस स्पर्श करण्यास मनाई असल्याने अशा ठिकाणी परिचयाच्या, त्याच प्रमाणे दुर्मीळ वृक्ष वनस्पतींचा अभूतपूर्व विस्तार पाहण्यास मिळतो. आज उत्तरांचल, मेघालय, केरळ आणि तामिळनाडूमध्ये अशा असंख्य देवराईत अनेक वनप्रजातींचे जतन, संवर्धन होते आहे. कारण त्यांना मंदिरातील संपदा मानले जाते. जगातील पाणथळ प्रदेश अनेक महत्त्वपूर्ण परंतु दुर्लक्षित भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, जैवविविधतेचे संरक्षण, पूर नियंत्रण, शेतीस आधार इ. आपले बहुतेक जलस्त्रोत, पाणथळ जागा, मानवनिर्मित आहेत. विशेषत: गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू यांना सामान्यत: अर्ध शुष्क मानले जाते. ही ती राज्ये आहेत जिथे सर्वाधिक मानवनिर्मित पाणथळ जागा आहेत. प्राचीन काळापासून राज्य करणाऱ्या आपल्या अनेक राजांनी जलस्त्रोतांना प्राधान्य दिले. त्यांनी झाडे लावली, जलाशय निर्माण केले. जे आजही जीवसृष्टीस उपयुक्त आहेत.

जैवविविधतेस असलेले धोके

गेल्या अनेक वर्षात बरेच काही नष्ट झाले आहे. अजूनही नष्ट होते आहे. खाणकाम, व्यावसायिक क्रियाकलाप, बांधकाम, शिकार, जंगलतोड आणि इतर हानिकारक कृतींनी भारतातील जैवविविधतेच्या वैभवशाली अस्तित्त्वास धोक्यात आणले आहे. प्रदूषण आणि हवामान बदल त्यात अधिकची भर घालत आहेत. या शोकांतिकेतील एक प्रमुख खलनायक म्हणजे अधिवासाचा प्रचंड विनाश. आज यावर एक पर्यायी उपाय प्रचलीत आहे तो म्हणजे जर तुम्ही एका हेक्टरमधील झाडे तोडली तर दुसऱ्या हेक्टरमध्ये झाडे लावून भरपाई करा. तथापि, या प्रक्रियेत खरे नुकसान होते ते म्हणजे परिसंस्थेच्या हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचा नाश होणे. भारताने आपली 40 टक्क्यांहून अधिक जंगले, खारफुटीची वने आणि पाणथळ जागांचा मोठा भाग आधीच गमावला आहे. विनाशकारी व्यापारी पद्धती, देशी अन्नधान्य आणि तृणधान्यांना मिळणारा अपुरा मोबदला, विकासामुळे होणारे लोकसंख्या शास्त्रीय बदल आणि जैवविविधतेच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणारे सदोष नियोजन व पारंपारिक व्यवस्थापन पद्धतीस कालबाह्या ठरवून, अशा खत पद्धतींचा अवलंब अशा गोष्टींमुळे समस्येचे गांभिर्य वाढत आहे. जैवविविधतेचे संरक्षण करणे केवळ पर्यावरणीय कारणांसाठी महत्त्वाचे नाही तर ते जवळपास 70 टक्के भारतीयांच्या उपजीविकेस आधार देते, म्हणूनही महत्त्वाचे आहे. कृषी विविधता लाखो लोकांना आपला उदरनिर्वाह करण्यास मदत करते. समृद्ध जैवविविधता अन्न, रोजगार, पोषण, जैविक कीटकनाशके, पारंपारिक औषधे, घरांसाठीचे साहित्य चारा, इंधन मिळवून देण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर त्यामुळे हवामान स्थिर होण्यास, पर्जन्यमान सुधारण्यास आणि माती व भूजल पातळी समृद्ध होण्यास मदत होते.

संरक्षक उपाय योजना

जैवविविधता संरक्षण आणि संरक्षणाच्या आधुनिक संकल्पनेत माणसे खूप महत्त्वाची आहेत. मानवी समुदाय प्रभाव टाकू शकतात. जी मानवी प्रजाती विध्वंस करण्यास सक्षम आहे. तिला संरक्षकाची भूमिका दिली तर बदल घडू शकतात. हा विचार या संकल्पनेमागे आहे. उदाहरणार्थ, पेरियार व्याघ्र अभयारण्यात अशा एका कृतीमुळे कट्टर शिकारी, वन्यजीव संरक्षकांमध्ये बदलले. प्रसिद्ध जलसंरक्षक आणि पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांनी अलवरमध्ये साध्या जल व्यवस्थापन तंत्राचा वापर करुन मृत परिसंस्थांना पुन्हा जिवंत केले. ग्रमीण भारतात महिलांकडे समृद्ध पारंपारिक ज्ञान आहे. त्यांच्या समावेशाने, कृषी जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी मोठी मदत होऊ शकते. काही ठिकाणी हे प्रयोग सुरु आहेत. त्यात वाढ होण्याची गरज आहे. सरकारी पातळीवर जैविक विविधता सुधारणा कायदा 2023 ने जैवविविधतेचे संवर्धन, शाश्वत वापरास प्रोत्साहन आणि न्याय लाभ वाटप सुनिश्चित करणाऱ्या आधीच्या कायद्याची चौकट बळकट करुन, अंमलबजावणी अधिक सुलभ व सध्याच्या गरजांशी सुसंगत केली आहे. यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि पारंपारिक ज्ञानावर आधारित पद्धती व सामुहिक सहभागास बळ मिळाले आहे.

अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.