बिली जीन किंग चषक टेनिस स्पर्धा आजपासून
यजमान भारत आणि थायलंड यांच्यात सलामीची लढत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
येथील दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या स्टेडियमवर मंगळवारपासून बिली जिन किंग चषक आशिया-ओसेनिया गट 1 महिलांच्या टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत यजमान भारतीय टेनिस संघ सलामीच्या होणाऱ्या थायलंडविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज झाला आहे.
भारतीय टेनिस संघाचा बहिस्थ कर्णधार विशाल उप्पलने आपला संघ या स्पर्धेत निश्चितच दर्जेदार कामगिरी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खडतर सराव करीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. दिल्लीतील एप्रिल महिन्यातील हवामान अधिक उष्ण असल्याने विविध देशांच्या खेळाडूंची दमछाक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उष्ण हवामानात भारतीय संघातील खेळाडूंनी चांगलाच खडतर सरावावर भर दिला आहे.
भारतीय टेनिस संघामध्ये वैष्णवी आडकर, सहजा यमलापल्ली, अंकिता रैना, ऋतुजा भोसले, झील देसाई यांचा समावेश आहे. श्रीवल्ली भामिदीपती आणि वैदेही चौधरी या दोन खेळाडू दुखापतीमुळे आपल्या संघात शेवटच्या क्षणी दाखल झाल्या आहेत. झील देसाईने गेल्या आठवड्यात झालेल्या एका स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. 21 वर्षीय वैष्णवी आडकरने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला मानांकनात अग्रस्थानावर नेले आहे. मात्र वैष्णवीचे पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात आगमन झाले आहे.
भारताची अनुभवी महिला टेनिसपटू अंकिता रैनाने गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिला हवामानाचा आणि संघातील इतर खेळाडूंच्या दर्जाची चांगलीच कल्पना आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना थायलंडबरोबर होत असून या सामन्यात निश्चितच भारतीय संघ दर्जेदार कामगिरी करुन विजयाने आपल्या मोहीमेला प्रारंभ करेल, अशी आशा कर्णधार विशाल उप्पलने व्यक्त केली आहे.
रविवारी येथे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांचे दिल्ली लॉन टेनिस संघटनेतर्फे शानदार स्वागत करण्यात आले आणि त्यांच्यासाठी रात्री खास मेजवानी आयोजित केली होती. सदर स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारत, इंडोनेशिया, कोरिया प्रजासत्ताक, मंगोलिया, न्यूझीलंड, थायलंड संघातील खेळाडू या समारंभाला उपस्थित होते. दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या स्टेडियमवर या स्पर्धेतील सामन्यांना दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार असून प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य राहील.