For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हिएतनाममध्ये अब्जाधीश उद्योजिकेला मृत्युदंड

07:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हिएतनाममध्ये अब्जाधीश उद्योजिकेला मृत्युदंड
Advertisement

1 लाख कोटीची फसवणूक : आणखी 85 जणांना शिक्षा

Advertisement

वृत्तसंस्था /हनोई

व्हिएतनामच्या प्रॉपर्टी टायकून ट्रुओंग माय लैन यांना मृत्युदंड ठोठावण्यात आला आहे. लैन यांच्यावर 11 वर्षांमध्ये साइगॉन कमर्शियल बँकेची (एससीबी) 1 लाख कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लैन प्रॉपर्टी डेव्हलपर कंपनी ‘वान थिन्ह फैट’च्या अध्यक्ष आहेत. 2022 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीसोबत बँकिंग नियमांचे उल्लंघन अन् लाचखोरीचे आरोप झाले आहेत. लैन यांच्यासोबत आणखी 85 जणांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यात माजी केंद्रीय बँकर, माजी शासकीय अधिकारी आणि एससीबी बँकेचे माजी अधिकारी सामील आहेत. या प्रकरणी 5 आठवड्यांपासून सुनावणी सुरू होती. लैन यांच्या विरोधात वकिलांनी कठोर कारवाईसोबत मृत्युदंड ठोठावण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. प्रॉपर्टी टायकून लैग यांनी 2012-22 पर्यंत स्वत:च्या प्रभावाचा वापर करत साइगॉन कमर्शियल बँकेकडून स्वत:च्या कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी चुकीच्या पद्धतीने कर्जाची उचल केली. यातील काही रक्कम त्यांनी स्वत:कडे ठेवली. तर फसवणूक लपविण्यासाठी ऑडिट अधिकाऱ्यांना लाच दिली. यामुळे बँकेला मोठे नुकसान झाले.  2012-22 कालावधीत लैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 3.66 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली, संबंधित बँकेच्या एकूण कर्जाच्या सुमारे 93 टक्के इतके हे प्रमाण होते. लैन यांच्यावर बँकेला 2.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान पोहोचविण्याचाही आरोप आहे.

Advertisement

अधिकाऱ्यांना दिली लाच

लैन यांच्याकडे एससीबीमध्ये कुठलेच अधिकृत पद नव्हते असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. परंतु न्यायाधीशांनी हा युक्तिवाद फेटाळला. लैन यांच्याकडे एकेकाळी विविध लोकांच्या माध्यमातून एससीबीवर 91.5 टक्के मालकी हक्क होता. त्या बँकेच्या सर्वोच्च अधिकारी होत्या.  लैन प्रत्यक्षात एससीबीच्या मालकीण होत्या. त्यांनी कर्ज प्रस्तावांचा अंतिम निर्णय घेणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती निश्चित केली होती. या सर्वांनी आपल्याला हवे तसे काम करावे म्हणून लैन यांनी त्यांना मोठी रक्कम दिली होती असे न्यायाधीशांनी नमूद केले आहे.

मोठी रक्कम स्वत:कडे बाळगली

2012-17 दरम्यान लैन यांनी स्वत:च्या लाभासाठी 368 कर्जप्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्देश दिला. यानंतर या कर्जासाठी तारण ठेवण्यात आलेल्या संपत्तींचे मूल्य कोसळले. यामुळे 2022 मध्ये लैन यांना अटक करण्यात आल्यावर या संपत्तीची किंमत घटल्याने एससीबीला 21 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. 2018-22 पर्यंत त्यांनी 916 कर्ज प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्देश दिला. तसेच कुठल्याही माहितीशिवाय 1 लाख कोटी रुपये स्वत:कडे ठेवले. यामुळे 43 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. एससीबीत होत असलेला घोटाळा लपविण्यासाठी लैन यांनी स्टेट बँक ऑफ व्हिएतनामच्या ऑडिटर्सना लाच देण्याची सूचना सहकाऱ्यांना केली होती. यानंतर एससीबीचे सीईओ वो तान होआंग वान यांनी केंद्रीय बँकेच्या बँकिंग निरीक्षण विभागाच्या प्रमुखाला 43 कोटी रुपयांची लाच दिली होती.

Advertisement
Tags :

.