For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानसिक आरोग्य संस्थेच्या समावेशाचे विधेयक संमत

11:51 AM Dec 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
मानसिक आरोग्य संस्थेच्या समावेशाचे विधेयक संमत
Advertisement

बेळगाव : कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात मानसिक आरोग्य संस्थेचा समावेश करण्यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेले कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्था दुरुस्ती विधेयक गुरुवारी विधानसभेत संमत करण्यात आले. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी हे विधेयक पारित करण्याची विनंती सभागृहाला केली. नोंदणी व तक्रार निवारण प्राधिकरणासाठी भारतीय वैद्यकीय संघटनेचे एक व नोंदणीकृत खासगी वैद्यकीय किंवा आयुष वैद्यकीय संघटनेच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. खासगी इस्पितळ सुरू करण्यासाठी सहा महिन्यांची तात्पुरत्या नोंदणीसाठी या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

त्यामुळे इस्पितळ सुरू करण्यासाठी होणारा विलंब रोखण्यात आला आहे. सहा महिन्यात इतर सर्व अटी पूर्ण करून पूर्ण प्रमाणात यापुढे परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंबंधीची तरतूद विधेयकात केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी डॉ. एन. टी. श्रीनिवास, शैलेंद्र बेलदाळे, एस. सुरेशकुमार, डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण आदींनी लहान क्लिनिक सुरू करण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. हा नियम शिथिल करावा, अशी मागणी केली. हा नियम शिथिल करणे आरोग्य खात्याच्या अखत्यारीत येत नाही. गृहमंत्री व गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली आहे. यासंबंधी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.