बिलावल भुट्टोंचा खोटारडेपणा उघड
भारतीय मुस्लिमांबद्दल केले खोटे वक्तव्य : पत्रकाराने केली बोलती बंद
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालयात पोहोचलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा बेइज्जतीला सामोरे जावे लागले आहे. यावेळी माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो हे भारतविरोधी दुष्प्रचाराच्या अंतर्गत केलेल्या स्वत:च्या वक्तव्यांमुळे लक्ष्य झाले आहेत. भुट्टो हे एका पत्रकार परिषदेत बोलत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात बिलावल हे काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वापर भारतात राजकीय अस्त्र म्हणून होत असून भारतात मुस्लिमांना खलनायकांप्रमाणे दाखविले जात असल्याचा खोटा दावा केला होता. दोन्ही देशांचे ब्रीफिंग पाहिले असून भारताच्या वतीने मुस्लीम महिला सैन्याधिकारी ब्रीफिंगमध्ये सामील होती असे निदर्शनास आणून देत एका पत्रकाराने भुट्टो यांची खिल्ली उडविली आहे. परदेशी पत्रकाराचे बोणे ऐकून बिलावर भुट्टो यांचा चेहरा उतरला आणि ते मान हलवत तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, असं म्हटलं.
भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अ•dयांना लक्ष्य केले होते. भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालयात पत्रकारांसमोर भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारतात मुस्लिमांना खलनायक ठरविले जात असल्याचा खोटा दावा केला. यानंतर एका पत्रकाराने बिलावल यांना त्यांचा खोटारडेपणा दाखवून दिला. ऑपरेशन सिंदूरचे ब्रीफिंग कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी केले होते. सिंह या भारतीय वायुदलात हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांच्यासोबत विदेश सचिव विक्रम मिसरी यांनीही ब्रीफिंगमध्ये भाग घेतला होता. पाकिस्तानने भारताची नक्कल करत बिलावल यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ अनेक देशांमध्ये पाठविले आहे. परंतु आता भुट्टो यांची याकरता झालेल्या निवडीवर पाकिस्तानच्या सरकारवर टीका होतेय. तसेच पाकिस्तान सरकार पूर्वीच भारताच्या विरोधात साथ देणाऱ्या मुस्लीम देशांशी संपर्क साधत असल्याचा आरोप होत आहे.