बिलावल भुट्टोकडून आण्विक युद्धाची धमकी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनी सिंधू जल करार स्थगित करण्यावरून भारताला आण्विक युद्धाची धमकी दिली आहे. भारत सिंधू जल कराराचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या जलसंपदेला नुकसान पोहोचवित आहे, यामुळे पाण्यावरुन पहिले आण्विक युद्ध होण्याची स्थिती निर्माण होत असल्याचा दावा भुट्टो यांनी वॉशिंग्टनच्या मिडल ईस्ट इन्स्टीट्यूटमध्ये बोलताना केला आहे.
पाकिस्तानचा जलपुरवठा रोखण्याची भारताची कृती ही युद्धासारखीच आहे. तसेच हे पाकिस्तानसाठी अस्तित्वाचे संकट आहे. भारताला सिंधू जल करार रोखण्याची अनुमती देण्यात आल्यास अन्य देशांसाठी देखील हे एक धोकादायक उदाहरण ठरू शकते. भारत अनेक वर्षांपासून कायम राहिलेले संतुलन बिघडवत आहे, असे बिलावल यांनी म्हटले आहे.
आमचा पाणीपुरवठा रोखणे युद्धाची कारवाई ठरेल, अशी घोषणा आम्ही केली आहे. पृथ्वीवरील कुठलाही देश स्वत:चे अस्तित्व आणि पाण्यासाठी लढेल. भारताने सिंधू जल कराराचे पालन करावे आणि या कराराच्या अंमलबजावणीकरता अमेरिका आणि अन्य देशांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे वक्तव्य बिलावल यांनी केले आहे. आम्हाला भारतासोबत सकारात्मक चर्चा करायची आहे, नव्या व्यवस्था, नवे करार करायचे असतील तर निश्चितपणे भारताला जुन्या करारांचे पालन करावे लागेल. सिंधू जल कराराविषयी भारताला स्वत:चा निर्णय मागे घ्यावा लागेल, असा दावा भुट्टो यांनी केला आहे.