Kolhapur News : हेब्बाळ-जलद्याळ येथील ओढ्यातून वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराची सुटका
पुराच्या प्रवाहात अडकलेला युवक गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे बचावला
नेसरी : गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे हेब्बाळ-जलद्याळ ते लिंगनूर दरम्यान असणाऱ्या ओढ्यावर अचानक पाणी येऊन तो ओढा दुथडी भरून वाहू लागला. या ओढ्यावरील पुराच्या पाण्यातून दुचाकी घेऊन जात असताना पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे दुचाकीसह ओढ्यात गेलेल्या एका युवकाची सुटका प्रत्यक्षदर्शीनी केली. प्रसंगावधान राखत तिथल्या गावकऱ्यांनी केलेल्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
गुरुवारी सायंकाळी अचानक ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार केला. सर्वत्र पाणीच पाणी करत विजेच्या कडकडाटांसह जोराच्या कोसळणाऱ्या या पावसाने शेती कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण होते. तर याच वेळी हेब्बाळ-जलद्याळ ते लिंगनुर दरम्यान असणाऱ्या ओढ्याला या मुसळधार पावसाने मोठे पाणी आले होते. ओढ्यावरील पूल या पुराच्या पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक उशिरापर्यंत बंद पडली होती.
मात्र सायंकाळच्या सुमारास काम आटोपून दडीकडून अडकुरकडे निघालेल्या एका युवकाने पाण्याचा अंदाज न घेताच दुचाकीसह हा ओढा पार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी असणाऱ्या सर्वांनी गाडी घालू नको म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. पण घरी जाण्याच्या घाईमुळे त्या युवकाने गाडी ओढ्यावरील पाण्यातघातली.
ओढ्यावरील पुलावर आलेल्या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, दुचाकीसह तो युवक वाहून जाऊ लागल्याने बघणाऱ्यानी आरडाओरड सुरू केला. यावेळी तो युवक ओढ्यावरून सरळ पुढे वाहत गेला.त्याठिकाणी असलेल्या हेब्बाळ-जलद्याळ येथील प्रकाश दावणे, तेजस दावणे, संजय करंबळकर, यांनी प्रसंगावधान राखून त्वरित धाव घेतली आणि दोरीच्या सहाय्याने त्या युवकाला बाहेर काढले.
२२ वर्षाचा हा युवक परप्रांतीय असून त्याला बाहेर काढताच भीतीने गाळण उडालेल्या हा युवक नाव न सांगताच तेथून निघून गेला. त्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. उपस्थित नागरिकांच्या या मदतीने व धाडसाबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे.