दुचाकी-बस अपघातात दुचाकीस्वार ठार
रामनगर-कारवार मार्गावरील घटना
रामनगर / वार्ताहर
रामनगर-कारवार मार्गावर खानापूर येथून जगलबेटच्या दिशेने जाणाऱ्या बुलेटने बसला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. रामनगर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
कारवार येथून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या कारवार-बेळगाव बसला (क्रमांक KA 31 F 1652) विरुद्ध दिशेने जाऊन बुलेट बाईकने ( क्रमांक KA 22. HJ. 1193) धडक दिल्याने दुचाकीस्वार अनिल संभाजी पाटील (वय 35 राहणार हारुरी तालुका खानापूर) तसेच मागे बसलेला ज्योतिबा गडकरी (रा. वरकड, तालुका खानापूर) हे दोघे ही गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम 108 रुग्णवाहिकेतून रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले. त्यामधील अनिल पाटील याचा वाटेतच मृत्यू झाला. ज्योतिबा गडकरी याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अनिल पाटील याला खानापूर तालुक्यात बॉडी बिल्डर म्हणून ओळखला जात होता. व्यवसायाने तो जेसीबी ऑपरेटर होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अपघातग्रस्त ठिकाण हे दगडी खाणीला जाण्याचा मार्ग असून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अपघात खड्डा चुकवण्याच्या नादात दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जाऊन बसला ठोकर दिल्याचे झाल्याचे निर्देशात आले. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. तर सदर खड्डादगडी खाणीवरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे झाले असून खाण मालकांकडून आता तरी ते खड्डा बुजवण्याची मागणी केली जात आहे.