धारगळ येथील अपघातात दुचाकीस्वार ठार
अपघात की घातपात ? : पेडणे पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आव्हान
पेडणे : दाडाचीवाडी धारगळ येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास टेम्पो रिक्षाने स्कूटरला मागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात देविदास ऊर्फ देऊ चंद्रकांत कोनाडकर (49, दाडाचीवाडी, धारगळ) यांचा मृत्यू झाला. मात्र धडक दिलेल्या टेम्पो रिक्षाने घटनास्थळावरून पलायन केले. यामुळे सदर अपघात हा अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित होत असून सदर टेम्पो रिक्षा चालकाला शोधणे पेडणे पोलिसांसमोर आव्हान आहे. टॅक्सी व्यावसायिक असलेले देविदास कोनाडकर हे नागझर येथून आपल्या स्कूटरने (जी.ए 11 एफ 3368) घरी येत असता दाडाचीवाडी- धारगळ येथे पोहोचले असता गुड्स करियर टेम्पो रिक्षाने मागून त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत स्कूटरसह ते रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनचालकाने वाहनासह पलायन केले. देविदास कोनाडकर यांना उपचारासाठी कासारवर्णे येथील सरकारी इस्पितळात नेत असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह गोमेकॉत पाठवला आहे. शवचिकित्सा अहवाल अजून मिळालेला नाही. देवीदास कोनाडकर यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह कासारवर्णे येथून पीर्ण मार्गे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोणाला न कळता गुपचूप नेण्यात आला त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. जर हा घातपात नसेल तर हा मृतदेह लपून-छपून का नेला असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.