तार दुचाकीत अडकून घोडेमुख येथे दुचाकीस्वार जखमी
अजून किती अपघात पाहणार ; ग्रामस्थांचा वीज वितरणला सवाल
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड येथून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना दुचाकीस्वार मदन मुरकर यांच्या दुचाकीला गंजलेली तार अडकून अपघात झाला. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मूरकर यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. सुदैवाने मोठा अपघात टळला. परंतु धोका कायम असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.घोडेमुख पेंडूर ग्रामपंचायत जवळील मुख्य रस्त्यावर विद्युत वाहिन्यांना सपोर्ट देणारी वायर काढून टाकण्यात आली आहे. गुरांच्या ये जा करण्यामुळे ही वायर रस्त्यावर आली असून चालकांच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.अधिक माहिती अशी की,मळेवाडमधील मदन मुरकर हे सावंतवाडीच्या दिशेने जात असताना पेंडूर घोडेमुख ग्रामपंचायती जवळील मुख्य रस्त्यावर त्यांच्या दुचाकीच्या चाकाला तार गुंडाळली. सुमारे चार ते पाच मीटर दुचाकी गेल्यानंतर मदन मुरकर यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व दुचाकी घसरून अपघात झाला. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मुरकर यांना बाजूला केले व दुचाकीला अडकलेली वायर काढली. परिसरातील अनेक ठिकाणी जीर्ण झालेले विद्युत खांब, टाकाऊ तारा व विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडे याकडे वीज वितरणचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे अजून किती अपघात पाहणार असा सवाल उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरणला केला आहे.