बिजगर्णी ग्रा.पं.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी रेखा नाईक तर उपाध्यक्षपदी नामदेव मोरे यांची निवड
वार्ताहर/किणये
बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही निवडणूक प्रक्रिया सोमवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडली. अध्यक्षपदी रेखा नाईक यांची तर उपाध्यक्षपदी अॅङ नामदेव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बिजगर्णी, कावळेवाडी, येळेबैल, राकसकोप या चार गावांचा समावेश आहे. तर एकूण 14 ग्रामपंचायत सदस्य आहेत. यापैकी सोमवारी निवडणूक प्रक्रियेवेळी अकरा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तर तीन ग्रामपंचायत सदस्य गैरहजर होते. अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती महिला व उपाध्यक्ष पदासाठी सामान्य असे आरक्षण होते.
अध्यक्षपदासाठी रेखा सागर नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तर उपाध्यक्ष पदासाठी नामदेव मोरे यांचा एक अर्ज आला. त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून वॉटर सप्लाय खात्याचे अशोक शिरूर यांनी काम पाहिले. यावेळी पीडिओ रविकांत हे उपस्थित होते. माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. कारण त्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये विविध विकासकामे राबविली. मृणाल हेब्बाळकर व युवराज कदम आदींच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष रेखा नाईक व उपाध्यक्ष नामदेव मोरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुंडलिक जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, संतोष कांबळे, लक्ष्मी पाटील, लक्ष्मी कांबळे, मनीषा सुतार, गायत्री सुतार, चंद्रभागा जाधव, शितल तारिहाळकर आदींसह नागरिक उपस्थित होते.