विजापूर विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत
सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून पाहणी
बेळगाव : विजापूर शहराबाहेर सुरू असलेल्या विमानतळाच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून करण्यात आली. प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून लवकरच विमानसेवा या भागातील नागरिकांसाठी सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विजापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी विमानतळ उभारण्यात येत आहे. सदर कामाची पाहणी करण्यात आली. टर्मिनल बांधकाम, रनवे, टॅक्सी वे, बॅगेज हॅडलिंग व्यवस्था, सेक्युरिटी यासह विविध कामांची पाहणी करण्यात आली. सुरू असलेल्या कामांबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, विमानतळाचा दर्जा वाढविण्यात येत आहे. विकासकामे 90 टक्के पूर्ण झाली आहेत. लवकरच इतर प्रलंबित कामे पूर्ण करून विमानसेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. जानेवारीमध्ये नागरिक विमानयान प्राधिकाराकडून विमानतळाची पाहणी करून चाचणी घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
रात्रीच्या विमान लँडिंगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या विमानतळामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून व्यापारी पिकांच्या निर्यातीसाठी विमानतळ उपयोगी ठरणार आहे. जिल्ह्याच्या प्रवासोद्योमालालाही चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सिव्हिल कामांसाठी 105.60 कोटी तर एव्हियोनिक्स उपकरणांसाठी 19.40 कोटी निधी निश्चित करून विकासकामे राबविण्यात आली आहेत. यामध्ये टर्मिनल बांधकाम, एटीसी टॉवर, कंपाऊंड आदी विकासकामे राबविण्यात आली आहेत. विमानतळावर वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा उभारण्यात आली आहेत. इतर कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार यशवंत रायगौड पाटील, सी. एस. नाडगौड, अशोक मनगोळी, माजी आमदार राजू आलगूर यांच्यासह बांधकाम खात्याचे अधिकारी, विमानतळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.