बिहारची निवडणूक : उन्मादी विजय, भयभीत विरोधक
बिहारमध्ये भाजप-प्रणीत रालोआला विधानसभा निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश अक्षरश: स्तीमित करणारे आहे. महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणामधील विजयाच्या पार्श्वभूमीवर बघितले तर या अमाप यशाने विरोधकांची छाती दडपून गेली नसती तरच नवल होते. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विरोधी पक्षांच्या महागठबंधनचा सत्ताधाऱ्यांनी अगदी पालापाचोळा केला.
या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच त्यात रालोआ जिंकेल असा विश्वास विरोधकांच्या एका गटाला वाटत होता. त्याला कारण भाजप, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि रालोआतील इतर मित्रपक्षांना विविध जातसमाजांकडून जो पाठिंबा मिळतो तो विरोधकांपेक्षा थोडा जास्त होता. त्याचबरोबर विरोधकांनी जागा वाटपात केलेला गोंधळ आणि काही जागांवर झालेल्या मैत्रीपूर्ण लढती देखील त्यांच्या अंगलट आल्या. बिहार हा जातीपातीच्या राजकारणाकरता प्रसिद्ध आहे. गेल्या वेळी दोन्ही प्रतिस्पर्धी आघाड्यांमध्ये संपूर्ण राज्यभर केवळ 35,000 मतांचा फरक होता यावरून जेव्हा निवडणूक सुरु झाली तेव्हा ती किती चुरशीची होती हे दिसून येते.
वोट चोरीच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी चांगली सुरुवात केली खरी. पण ऐन मोक्याच्या क्षणी रणनीती आखायच्या ऐवजी ते सरळ परदेशी निघून गेले. सेनापती गेला की सैन्य बसते हा अनुभव आपल्या देशात पुरातन काळापासून दिसून आला आहे. काँग्रेसला चांगली-वाईट दिशा देणारा एकच नेता आहे तो गायब झाला की सैन्य सैरावैरा तरी होते नाहीतर निवडणुकीतून अंगतरी काढून घेते, असा अनुभव वारंवार येऊनदेखील हे असे का झाले ते कळेनासे आहे. काँग्रेसचे पानिपत झाले कारण त्याचा ‘सदाशिवरावभाऊ’ च अचानक रणधुमाळीत तात्पुरता का होईना गायब झाला.
त्यात महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांचे नाव घोषित करण्याकरता काँग्रेसने एव्हढे आढेवेढे घेतले की त्यामुळे पहिला घास घेत असतानाच पानात माशी पडावी असे झाले. या मुद्यावर ज्याप्रमाणे काँग्रेस वागले त्यामुळे तेजस्वी मुख्यमंत्री बनू नयेत असेच त्याला वाटत होते, असा कोणाकोणाचा बरावाईट ग्रह झाला. दुसरी गोष्ट अशी की तहान लागली की विहीर खणल्याप्रमाणे काँग्रेस कोणत्याही राज्यात निवडणूक आली की त्याअगोदर सहा महिने जागी होते. काँग्रेसच्या वैभवाच्या काळात हे सारे ठीक होते कारण त्या बहुतांश वेळात विरोधी पक्षांनी पाय देखील रोवले नव्हते. लालू यादव आणि त्यांच्या राजद पक्षाने मुस्लिम आणि यादव यांच्याशिवाय नवीन मतपेढी जोडलेली दिसत नाही हे देखील या निकालातून दिसून येते.
राज्यातील विक्रमी मतदानाने देखील राजकीय जाणकारांना हैराण केले. असे मतदान काय वळण घेईल याबाबत उलटसुलट तर्क होऊ लागले. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेद्वारे महिला वर्गाला खूष करून बाजी मारण्यात आली तसेच बिहारमध्ये एक कोटीपेक्षा जास्त महिलांना निवडणुकीअगोदर 10,000 रुपयांचे दोन हप्ते देऊन ही निवडणूक भाजप व त्याच्या मित्रपक्षांनी मारली, हा विरोधकांचा दावा देखील विचार करायला लावणारा आहे. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकेकाळी ‘रेवडी’ बाबत शंख केला होता, त्यांनीच ‘रेवडी’ चा वापर करून ही निवडणूक जिंकली असा स्पष्ट आरोप वी आय पी पक्षाचे मुकेश सहानी यांनी केला आहे.
टायगर अभी जिंदा है
निवडणुकीचे कल जसजसे येऊ लागले तसे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बंगल्यापुढे ‘टायगर अभी जिंदा हैं’ असे सूचक पोस्टर लावून पुढील मुख्यमंत्री तेच होणार असे सूचित करण्यात आले. 20 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नितीश परत ते पद मिळवणार हे खरे असले तरी त्यांना हे पद फार काळ राखता येईल असे दिसत नाही. विरोधकांची या निवडणुकीत जी दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे ‘पलटू राम’ नितीशना होता येणार नाही. असे असल्याने भाजप चतुराईने त्यांना हळूहळू बाजूला सारून आपला मुख्यमंत्री बनवेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. नितीश यांची तब्येत ढासळत असल्याने त्यांचा एकुलता एक मुलगा निशांत याला मंत्री बनवून वेळप्रसंगी त्यांच्या संयुक्त जनता दलात फूटदेखील पाडली जाईल असे बोलले जाते.
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे बारा वाजले असले तरी त्यांनी जे मुद्दे उभे केले त्याने बिहारचे राजकारण बदलायला नक्कीच मदत होणार आहे. किशोर यांनी स्वत: निवडणूक न लढवून आपल्या पक्षाचे जास्त नुकसान केले. एवढ्या चुरशीने प्रतिस्पर्धी आघाड्यात ही निवडणूक लढवली गेली की जनसुराज बाजूला फेकला गेला. नितीश कुमार यांनी समता पक्षाच्या नावाने पहिली निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे जर किशोर यांनी संघर्ष चालू ठेवला तर त्यांचे भविष्य उज्वल नाही, असे म्हणता येणार नाही. जाणकारातील एक गट मात्र बिहारच्या राजकारणाचे जातीय स्वरूप अजिबात बदललेले नाही हे या निवडणुकीने पुन्हा दाखवले आहे असे ठामपणे सांगत आहे.
किशोर यांना भावी काळात समविचारी पक्षांशी निवडणूक समझोते करावे लागतील हे मात्र खरे. या निवडणुकीत नितीश यांना 25 पेक्षा जास्त जागा आल्या तर आपण राजकारण सोडून देऊ हा किशोर यांचा दावा एकदम खोटा ठरला आणि त्यांचेच दात त्यांच्या घशात गेले हे देखील तेव्हढेच खरे.
वोट चोरीच्या गंभीर आरोपानंतर झालेली बिहारची निवडणूक ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली असे म्हणणे मात्र धाडसाचे ठरेल. ज्ञानेश कुमार यांच्यासारखे वादग्रस्त मुख्य निवडणूक आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांशी संगनमत केलेला निवडणूक आयोग जोपर्यंत आहे तोपर्यंत गैरभाजप पक्षांनी सर्व निवडणुकींचा बहिष्कार केलेला बरा असा जाहीर सल्ला एकेकाळी भाजपचे केंद्रातील अर्थ मंत्री तसेच परराष्ट्र मंत्री राहिलेल्या यशवंत सिन्हा यांनी दिला आहे तो बोलका आहे. कोठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे अशी भावना विरोधी पक्षात आहे त्याचेच ते प्रतिक होय. नवीन वर्षात पाच राज्यात निवडणूक होऊ घातली आहेत. रालोआच्या या उन्मादी विजयाने नवीन प्रांत पादाक्रांत करण्याकरता भाजपचे बाहु फुरफुरणार आहेत. त्यामुळे बंगालमध्ये ममता
बॅनर्जी यांच्यापुढे गहिरे संकट उभे राहणार आहे. केरळमधील सामना हा सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी व काँग्रेस-प्रणित पुरोगामी लोकशाही आघाडीमध्ये असला तरी भाजप आपले राजकीय वजन वाढण्यासाठी या विजयाचा वापर करेल. तामिळनाडूमध्ये एम के स्टालिन यांना देखील वेगवेगळ्या रीतीने आव्हान उभे राहू शकते. आसाममधील अडचणीत आलेले भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांना आता नवीन उभारी येणार. बिहारमधील काँग्रेस व विरोधी पक्षांच्या झालेल्या या वाताहतीमुळे राहुल गांधींपुढील आव्हान 100 पटीने मोठे झाले आहे.
काँग्रेसचे नाणे परत खणखणीत करण्यासाठी त्यांना अगोदर भाजपचे नेतृत्व कशा प्रकारे काम करते हे अतिशय बारिकपणे समजून घेण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह हे साम-दाम-दंड-भेद वापरून राजकारण करतात हे आत्तापर्यंत दिसून आलेले आहे. ठकास महाठक होण्यासाठी कशाप्रकारे काम करावे लागेल हे त्यांना बघावे लागेल. काँग्रेसची मजबूत संघटना बांधावी लागेल. होयबांची सद्दी संपवावी लागेल. जमिनीवरील नेत्यांना पुढे आणावे लागेल. पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरावे लागेल. ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’, असे समजून चालणार नाही.
सुनील गाताडे