पॅराग्वेकडून सर्वांत मोठा धक्का, जर्मनी स्पर्धेबाहेर
फोक्सबोरो, मॅसॅच्युसेट्स : या विश्वचषकात पॅराग्वेसाठी खेळलेल्या आपल्या मागील दोन सामन्यांमध्ये होजे कॅनाले सुऊवातीपासून संघात नव्हता. पण त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात एक अविस्मरणीय कामगिरी केली. कॅनालेने पहिल्या सडन-डेथ पेनल्टी किकवर गोल केला, ऑर्लांदो गिलने शूटआऊटमध्ये दोन महत्त्वाचे बचाव केले आणि पॅराग्वेने जर्मनीला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 ने हरवून 2026 च्या विश्वचषकातील सर्वांत मोठा अनपेक्षित विजय नोंदवला.
या दक्षिण अमेरिकन देशासाठी हा एक मोठा विजय आहे. एकूण चार वेळा विजेत्या ठरलेल्या आणि 2014 मध्ये शेवटचे विजेतेपद पटकावल्यापासून विश्वचषकात संघर्ष करणाऱ्या जर्मनीसाठी हे स्पर्धेतून बाहेर पडण्याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण ठरले. विश्वचषकात जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करणारा पॅराग्वे हा पहिला संघ ठरला. जर्मनीच्या खेळाडूंना सहापैकी तीन पेनल्टी किक्समध्ये अपयश आले. यात जोनाथन टाहचाही समावेश होता, ज्याने ‘सडन-डेथ’च्या पहिल्या फेरीत चेंडू क्रॉसबारच्या वरून मारला, ज्यामुळे कॅनालेसाठी विजयाची संधी निर्माण झाली. टाहच्या या चुकीपूर्वी फॅबियन बाल्बुएनाचा गोल करण्याचा प्रयत्न जर्मन गोलरक्षक मान्युएल न्युअरने हाणून पाडला होता. जर तो प्रयत्न यशस्वी झाला असता, तर पॅराग्वेचा विजय तेव्हाच निश्चित झाला असता.
त्यापूर्वी अतिरिक्त वेळेत आपण आघाडी मिळवून देणारा गोल केला आहे, असे टाहला वाटले होते. 102 व्या मिनिटाला नॅथॅनिएल ब्राउनच्या कॉर्नर किकवर त्याने हेडरद्वारे गोल केला, परंतु व्हिडिओ पुनरावलोकनानंतर पंचांनी असा निष्कर्ष काढला की, चेंडू फटकावण्यापूर्वी वाल्डेमार आंतोननने गोलरक्षक गिलला धक्का देऊन खाली पाडले होते, त्यामुळे तो गोल रद्द करण्यात आला.
हा सामना अतिरिक्त वेळेनंतर 1-1 अशा बरोबरीत संपला. पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात ज्युलिओ एन्सिओने हेडरद्वारे गोल करून पॅराग्वेला आघाडी मिळवून दिली होती, परंतु 52 व्या मिनिटाला काई हाव्हर्ट्झने गोल करत जर्मनीसाठी बरोबरी साधली. आता शनिवारी फिलाडेल्फिया येथे होणाऱ्या 16 संघांच्या फेरीच्या सामन्यात पॅराग्वेचा सामना फ्रान्स आणि स्वीडन यांच्यातील विजेत्याशी होईल.
42 व्या मिनिटाला चेंडूच्या अचूक चालींद्वारे एन्सिओसाठी संधी निर्माण करत पॅराग्वेने सुऊवातीची कोंडी फोडली. यावेळी मिगुएल अल्मिरॉनने डाव्या पायाने माटियास गलार्झाकडे पास देत जर्मनीच्या अलेक्झांडर पावलोविच आणि नॅथॅनिएल ब्राउन यांच्यामधून मार्ग काढला. गलार्झाने एन्सिसोकडे क्रॉस पाठवला. एन्सिसोला जर्मन बचावपटूंनी रोखले नव्हते, त्यामुळे त्याने सहजपणे हेडरद्वारे न्युअरला चकवून गोल केला. दुसऱ्या सत्रात हॅव्हर्ट्झने फ्लोरियन विर्ट्झचा क्रॉस स्वीकारला आणि त्यावर योग्यरीत्या डोक्याचा स्पर्श करून चेंडूची दिशा बदलली, ज्यामुळे तो गोलरक्षक गिलला चकवून जाळ्यात गेला. गट फेरीत सर्वाधिक 10 गोल करणाऱ्या संघांपैकी एक असलेल्या जर्मनीला पॅराग्वेच्या 4-5-1 या बचाव-प्रधान रचनेला भेदणे कठीण गेले. पहिल्या सत्रामध्ये चेंडूवर जर्मनीचे 78 टक्के नियंत्रण होते.
पॅराग्वेने 24 वर्षांनंतर काढला वचपा
यापूर्वी जर्मनीने प्रमुख स्पर्धांमधील सातपैकी सहा पेनल्टी शूटआउट्स जिंकले होते. 1976 च्या युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात झेकोस्लोव्हाकियाकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांनी सलग सहा शूटआउट्स जिंकले होते. तसेच या दोन संघांमधील विश्वचषकातील एकमेव मागील सामन्यात 2002 च्या स्पर्धेत 16 संघांच्या फेरीत जर्मनीने पॅराग्वेचा 1-0 असा पराभव केला होता. जवळपास 24 वर्षानंतर पॅराग्वेने त्या पराभवाचा बदला घेतला.