Samrjit Ghatge | कागलच्या राजकारणात मोठी उलथापालथ! समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये
कागलचे नेते समरजीत घाटगे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश
मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील कागलचे नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून, त्यांनी आपल्या या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कागलच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असलेले समरजीत घाटगे यांनी आज अखेर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा घरवापसी करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत हो सोहळा पार पडला. समरजीत घाटगे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले समरजीत घाटगे यांचा मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश पार पडला. या पक्ष प्रवेशापूर्वी समरजीत घाटगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मी माझी भूमिका शरद पवार यांना स्पष्टपणे सांगितली आहे. त्यांनी मला भाजप प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कागलमधील काही विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे मला शरद पवारांच्या पक्षात जावे लागले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मी पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे,
असे समरजीत घाटगे म्हणाले.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने माझा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहे. माझे संपूर्ण राजकीय भवितव्य मी आता फडणवीस यांच्यावर सोपवले आहे. २०२९ ची निवडणूक लढवायची की नाही, हे देखील तेच ठरवतील. पक्षाचा जो आदेश येईल, तो मी पूर्ण क्षमतेने पाळणार आहे. मी आणि हसन मुश्रीफ आम्ही दोघेही आता महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या काहीही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे समरजीत घाटगे यांनी स्पष्ट केले.