For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतशी लवकरच मोठा व्यापार करार

06:51 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतशी लवकरच मोठा व्यापार करार
Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्याशी अध्यक्ष ट्रम्प यांची दाट मैत्री, त्यामुळे लवकरच घोषणा होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच मोठा व्यापार करार होणार आहे, अशी माहिती ‘व्हाईट हाऊस’ने दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची एकमेकांशी दाट मैत्री आहे. त्यामुळे लवकरच या कराराची घोषणा केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

या व्यापार करारातील तरतुदी कोणत्या असतील, या संबंधी अद्याप स्पष्टता नाही. आपल्या कृषी उत्पादनांना आणि जनुकीय सुधारित पिकांना भारताने आपली बाजारपेठ मोकळी करुन द्यावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. तसेच अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पिकणारा मका, सफरचंदे आणि सुकामेवा यांच्यावर भारताने अधिक कर आकारु नयेत, अशीही अमेरिकेची मागणी आहे. या मुद्द्यांवर कसा तोडगा काढला जातो, हे या कराराची घोषणा झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

लेव्हिट यांच्याकडून माहिती

व्हाईट हाऊसच्या वृत्तसचिव कॅरोलिना लेव्हिट यांनी या प्रस्तावित करारासंबंधी माहिती एका प्रसिद्ध वृतसंस्थेला मुलाखत देताना दिली आहे. गेल्या आठवड्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताशी असा करार होणार आहे, असे स्पष्ट केले आहे आणि तसे होणे निश्चित आहे. अध्यक्ष ट्रंप यांनी यासंबंधी अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक यांच्याशी चर्चा केली आहे. हे मला स्वत: लुटनिक यांनीच स्पष्ट केले आहे, अशी माहिती लेव्हिट यांनी दिली आहे.

हिंद-प्रशांतीय क्षेत्रात भारताचे महत्व

हिंद-प्रशांतीय क्षेत्रात भारताचे मोठे महत्व आहे. या क्षेत्रात चीन आक्रमकपणे आपले हातपाय पसरत आहे. त्यामुळे अमेरिकेला या बाबीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप या मुद्द्यालाही मोठे महत्व देत आहेत, असे सूचक विधान या मुलाखतीत कॅरोलिना लेव्हिट यांनी केले आहे.

काय होते ट्रंप यांचे विधान

आम्हाला भारतासमवेत बंधनमुक्त व्यापार हवा आहे. आमच्या सर्व प्रकारच्या उत्पादनानांना भारताने आपली बाजारपेठ मोकळी करुन द्यावी अशी आमची मागणी आणि इच्छा आहे. तथापि, भारताने अमेरिकेच्या उत्पादनांना भारतीय बाजारपेठ पूर्णत: मोकळी करुन दिलेली नाही. त्यामुळे आमची मागणी पूर्णत: मान्य होण्याची शक्यता दिसत नाही. तथापि, भारताशी एक मोठा व्यापार करार होऊ घातला आहे, तो लवकरच होणार आहे, अशा अर्थाचे विधान ट्रंप यांनी केले होते.

विधानाचा आधार

अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या याच विधानाचा आधार घेऊन व्हाईट हाऊस अधिकारी लेव्हिट यांनी भारताशी अमेरिकेचा करार निश्चितपणे होणार असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यातील गाढ मैत्रीचाही त्यांनी या संदर्भात उल्लेख केला आहे. भारत आणि अमेरिका यांची अनेक धोरणे एकमेकांना पूरक अशी आहेत, दोन्ही देशांसमोरील काही आव्हाने समान आहेत. साहजिकच भारत हा अमेरिकेचा एक मूल्यवान भागीदार आहे. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांना समजून घेऊन पुढची वाटचाल करतील असे दिसून येते, असा कॅरोलिना लेव्हिट यांच्या विधानाचा अर्थ काढण्यात येत आहे.

क्वाडचे माध्यम

हिंद-प्रशांतीय क्षेत्रात राजकीय आणि सामरिक समतोल रहावा, यासाठी अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांनी ‘क्वाड’ ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेत भारताला महत्व देण्यात येत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील नजीकच्या मैत्रीसंबंधांमध्ये या संघटनेची भूमिकाही महत्वाची आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारात भारत-अमेरिका संबंधांचे किती प्रमाणात प्रतिबिंब पडते, हा औत्सुक्याचा विषय आहे.

करारातील काय असणार...

ड भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित करारासंबंधी मोठे औत्सुक्य

ड लवकरच करार करण्याच्या दिशेने दोन्ही देशांची वेगात होत आहे वाटचाल

ड कृषी उत्पादनांच्या आयात निर्यातीवर तोडगा निघण्याची मोठी संभावना

ड 9 जुलैपूर्वी कराराच्या एका महत्वाच्या भागाची घोषणा होण्याची शक्यता

Advertisement
Tags :

.