Uddhav Thackeray | ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट? 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा धक्का ताजा असतानाच, आता महाराष्ट्रात सुध्दा एका मोठ्या पक्षात फुट पडल्याचे समोर येत आहे.. हा पक्ष दुसरा तिसरा कोणता नसुन ठाकरेंची शिवसेना आहे..... गेले बरेच दिवसांपासुन ठाकरे गटाचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहेत, राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर' सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे.
'मातोश्री'वरील बैठकीला ५ खासदारांची दांडी?
याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी 'मातोश्री'वर आपल्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, एकूण ९ खासदारांपैकी केवळ ४ खासदारच या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित ५ खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीला जोडले गेले होते, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
आम्हाला ऑपेरेशन टायगरची गरज नाही - उदय सामंत
उबाठाच्या कोणत्याही खासदारासोबत संपर्क नाही, अशी कोणतीही मीटिंग झाली नाही. आम्हाला ऑपेरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच, संजय राऊत यांच्या पेशन्सला दाद देत त्यांनी उबाठाचं अस्तित्व टिकवलं आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, एकप्रकारे उदय सामंत यांनी ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात नसल्याचेच सूचवलं आहे.
राष्ट्रहितासाठी घडामोड होत असेल तर चांगले - सुधीर मुनगंटीवार
दरम्यान, राष्ट्रहितासाठी घडामोड होत असेल तर चांगले आहे, उबाठाचे खासदार देश हितासाठी सोबत येत असतील तर स्वागत आहे, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया दिली. तसेच, अटल बिहारी वाजपेयींचे सरकार असताना काँग्रेसने काय केलं, असेही त्यांनी म्हटलं.