For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Farmers News | शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठीचा लढा यशस्वी; शेतीपंपावरील उपसा बंदी तीन दिवसांसाठी शिथिल

05:58 PM Jun 19, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur farmers news   शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठीचा लढा यशस्वी  शेतीपंपावरील उपसा बंदी तीन दिवसांसाठी शिथिल
Advertisement

कोल्हापुर- खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी उभारलेल्या संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले आहे. शेतीपंपांसाठी लागू करण्यात आलेली पाणी उपसाबंदी तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश येत प्रशासनाने ही बंदी तीन दिवसांसाठी शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतला आहे. शेतकऱ्यांचा इरिगेशन फेडरेशनच्या वतीने लढा सुरु होता. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

खरीप हंगाम सुरू होत असताना पाण्याअभावी पेरण्या आणि शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, शेतकरी प्रतिनिधी, इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.

या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला तर खासदार धैर्यशील माने यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेत दोन्ही नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली होत उपसा बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार अरुणराव लाड, माजी आमदार उल्हासदादा पाटील, भारत पाटणकर, भैय्यासाहेब भुयेकर, बाबासाहेब देवकर, राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Advertisement

या संपूर्ण लढ्यात इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यावेळी शेतकरी प्रतिनिधी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला सकारात्मक निर्णय घ्यावा लागला. सध्या तीन दिवसांसाठी उपसा बंदी हटविण्यात आली असली तरी पुढील निर्णय धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पाणीपातळी आणि परिस्थितीचा आढावा घेऊनच घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी उभारलेल्या या लढ्याला मिळालेले यश हे केवळ एका निर्णयापुरते मर्यादित नसून शेतकरी एकजुटीच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा झालेली प्रचिती मानली जात आहे.

Advertisement
Tags :

.