एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात चिदंबरम यांना मोठा दिलासा
कनिष्ठ न्यायालय कारवाई करणार नाही; ईडीलाही बजावली नोटीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध एअरसेल-मॅक्सिस प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. चिदंबरम यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत. तसेच न्यायालयाने ईडीला नोटीसही बजावली असून चिदंबरम यांच्या याचिकेवर उत्तर मागितले आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्राची दखल घेण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला चिदंबरम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जानेवारीला होणार आहे. सविस्तर आदेश नंतर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजाला स्थगिती दिली. याबाबत ईडीला नोटीसही पाठवण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांच्याविऊद्ध एजन्सीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांनी बुधवारी याबाबत झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्याविऊद्धची कारवाई पुढील सुनावणीपर्यंत स्थगित राहणार असल्याचे स्पष्ट केले. अंतरिम दिलासा म्हणून चिदंबरम यांनी खालच्या न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.
कनिष्ठ न्यायालयाकडून समन्स
सत्र न्यायालयाने 27 नोव्हेंबर 2021 रोजी एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात चिदंबरम आणि कार्ती यांच्याविऊद्ध केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि ईडी यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रांची दखल घेतली होती. त्यानंतरच्या काही दिवसांत त्यांना समन्स बजावले होते. सीबीआय आणि ईडीने नोंदवलेल्या भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात चिदंबरम आणि इतर आरोपींना समन्स बजावण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात आला होता.