अत्यंत छोट्या घराला मोठी किंमत
खरेदीदाराला मिळणार सिक्रेट सरप्राइज
जर कुठलेही घर 60-70 लाख रुपयांच्या कक्षेत विकत असेल तर ते कमीतकमी दोन बेडरुम, हॉल आणि किचनने युक्त असेल, अशी अपेक्षा असते. परंतु यावेळी एक असे घर विकले जात आहे, ज्यात असे काहीच नाही. तरीही याची किंमत 60 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. यात केवळ 4 फूट इतकीच जागा असून आत काहीच नाही. इंग्लंडच्या डोरसेटमध्ये केवळ 4 फूट रुंद छोटेसे घर विकले जातेय. समुद्र किनाऱ्यावर निर्मित लाकडाचे केबिन 55 हजार पाउंड म्हणजेच जवळपास 63 लाख रुपयांमध्ये विकले जातेय. परंतु रियल इस्टेटकडून याला दुर्लभ संधी ठरविले जातेय आणि याचे कौतुक होतेय.
एल्विन्स रियल इस्टेट या घराला विकत आहे. पूर्वी अशाप्रकारच्या जागा 2 लाख पाउंडपेक्षा अधिक किमतीत विकल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. अबर्सोचच्या मुख्य बीचवर एक बीच हट प्लॉट खरेदी करण्याची आकर्षक संधी असून ती देखील नवे हट निर्माण करण्याच्या मंजुरीसह. स्वत:च्या समुद्र किनाऱ्याच्या हिस्स्याचे मालक व्हा, जेथे स्टोरेज आणि शेल्टरच्या सुविधेसह सेंट टुडवाल्स आयलँड्स आणि माच्रोस बीचदरम्यान आकर्षक दृश्य पाहता येईल, असे एल्विन्सने पोस्टमध्ये नमूद केले आहे. ही फ्रीहोल्ड प्रॉपर्टी असून ती या भागात कमीच पहायला मिळते. स्वानेजमध्ये निर्मित या केबिनला लोक सेकंड होम देखील म्हणत आहेत. याचबरोबर या केबिनला खरेदी करणाऱ्याला समोरील खासगी समुद्रकिनाऱ्यात हिस्सेदारीही मिळणार आहे. या केबिनची खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही तसेच डोरसेटमध्ये अन्य घरांवर आकारण्यात येणारा अतिरिक्त कौन्सिल
टॅक्सही भरावा लागणार नाही.
लोक आता समुद्रकिनारी कमी खर्चिक आणि कराच्या कटकटीपासून मुक्त सुटी घालवू इच्छितात. अशा स्थितीत हा छोटासा हट खरोखरच चांगली गुंतवणूक ठरणार आहे. समुद्रकिनारी एक ठिकाण इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही उत्तम संधी असल्याचे कंपनीचे सांगणे आहे.