इंडिगो विमानसेवेकडून मोठा निष्काळजीपणा
वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये प्रवाशांना त्रास
वृत्तसंस्था/ श्रीनगर, हैदराबाद
अहमदाबाद विमान अपघातानंतर हवाई प्रवाशांना दररोज विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. रविवार, 29 जून रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या दोन विमानांशी संबंधित मोठ्या निष्काळजीपणाच्या घटना समोर आल्या. पहिल्या घटनेत हैदराबाद विमानतळावर प्रचंड वाहतूक असल्याने पुणे-हैदराबाद फेरी विजयवाडा येथे वळवण्यात आली. तथापि, प्रवाशांना तेथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि एअरलाइनने त्यांना आवश्यक सुविधाही पुरवल्या. दुसऱ्या घटनेत इंडिगोच्या लेहहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने काही प्रवाशांना विमानतळावरच सोडून उड्डाण केले. मागे राहिलेल्या प्रवाशांनी लेह विमानतळावर गोंधळ घातला. एअरलाइनने आपल्याला कोणतीही मदत न केल्याचा आरोप प्रवाशांनी केला. या घटनेबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती.