For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द्वितीय तिमाही विकासदरात मोठी वाढ

06:58 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
द्वितीय तिमाही विकासदरात मोठी वाढ
Advertisement

सहा तिमाहींचा विक्रम : नोंदविली 8.2 टक्केवारी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सप्टेंबरमध्ये संपलेल्या या वित्तवर्षाच्या द्वितीय तिमाहीत भारताच्या विकास दराने मोठी झेप घेतली आहे. या तिमाहीचा विकासदर 8.2 टक्के असून तो गेल्या सहा तिमाहींमधील सर्वात अधिक आहे. गेल्या वित्तवर्षात याच तिमाहीत विकासदर अवघा 5.6 टक्के होता. त्या तुलनेत यावर्षीचा विकासदर अपेक्षेपेक्षाही अधिक आहे. अमेरिकेने भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केल्याचा दबाव भारताच्या अर्थव्यवस्थेवर असूनही ही प्रगती झाली आहे, हे विशेष मानण्यात येत आहे. सरकारनेही या विकासदरावर समाधान व्यक्त केले आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, हा आपला लौकीक भारताने या द्वितीय तिमाहीतही राखल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Advertisement

द्वितीय तिमाहीच्या विकासदराची संख्यात्मक माहिती शुक्रवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने घोषित केली आहे. वस्तू उत्पादन क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, आणि सेवा क्षेत्र या तीन्ही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्तम वाढ झाल्याने विकासदराने ही पातळी गाठली आहे, असे दिसून येते, असे मत अनेक अर्थतज्ञांनीही व्यक्त केले आहे.

समाधानकारक प्रगती

वित्तवर्ष 2025-2026 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीच्या अखेरीस भारताचे स्थिर किंमत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 48.63 लाख कोटी रुपये इतके आहे. ते गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 44.94 लाख कोटी होते. त्यामुळे ही वाढ 3 लाख 6 हजार कोटी रुपयांची आहे. या तिमाहीतील नॉमिनल स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 85.25 लाख कोटी रुपयांचे आहे. ही वाढ गेल्या याच तिमाहीच्या तुलनेत 8.7 टक्के इतकी आहे, अशीही माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिली आहे.

द्वितीय, तृतीय विभागांची मोठी प्रगती

अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातल्या द्वितीय आणि तृतीय विभागांमधील क्षेत्रांनी मोठी प्रगती साधल्याने स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात ही वाढ झाली आहे. वस्तू-उत्पादन क्षेत्राची वाढ 9.2 टक्के, बांधकाम क्षेत्राची वाढ 7.2 टक्के तर स्थूल द्वितीय विभागाची वाढ 8.1 टक्के अशी नोंदविली गेली आहे. सेवा क्षेत्र हे तृतीय मानले जाते. या क्षेत्राची वाढ या तिमाहीत 9.2 टक्के इतकी झाली आहे. वित्तसेवा, मालमत्ता विकास सेवा आणि व्यावसायिक सेवा या सेवाक्षेत्रातील तीन विभागांची वाढ 10.2 टक्के इतकी झाल्याचे दिसून आले आहे. खासगी उपभोगमूल्य (प्रायव्हेट कन्झंप्शन) क्षेत्रातील वास्तविक वाढ 7.9 टक्के असून ती मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या काळात 6.4 टक्के होती. याचा अर्थ मागणीवाढीत स्थिरता आलेली आहे. कृषीक्षेत्राची वाढ मात्र काहीशा कमी प्रमाणात झाली असून ती 3.5 टक्के आहे. तर वीजखप, इंधनवायू खप आणि पाणीपुरवठा यांच्यातील वाढ 4.4 टक्के इतकी नोंदली गेली आहे. अन्य क्षेत्रांच्या तुलनेत ही वाढ मंद असल्याचे दिसते.

प्रथम सहा महिन्यांमध्ये...

वित्तवर्ष 2025-2026 च्या प्रथम तिमाहीत विकास दर 8 टक्के राहिला. गेल्या वर्षीच्या प्रथम तिमाहीत तो 6.1 टक्के होता. तर विद्यमान वित्तवर्षाचा द्वितीय तिमाहीचा विकास दर 8.2 टक्के आहे. याचा अर्थ असा, की विद्यमान वित्तवर्षाच्या प्रथम सहामाहीत एकंतर सरासरी विकासदर 8.1 टक्के अशा समाधानकारक पातळीवर राहिला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

सध्याच्या जागतिक अस्थैर्याच्या आणि आव्हानात्मक काळातही भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकीक या तिमाहीतही राखला आहे. ही उपलब्धी अभिमानास्पदच आहे, अशी भलावण अनेक अर्थतज्ञांनी केली असून या भारताच्या उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही या संबंधी समाधान व्यक्त केले आहे. प्रगतीचा हा कल पुढेही असाच राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

बळकट अर्थव्यवस्थेच्या दिशेने...

ड द्वितीय तिमाहीतील विकासदर देशाला अधिक बळकटपणाकडे नेणारा

ड अर्थव्यवस्थेच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये समाधानकारक वाढीची नोंद

ड वस्तू-उत्पादन, बांधकाम, सेवा क्षेत्राची विकासदरात मोलाची कामगिरी

ड अमेरिकेने मोठे व्यापारी शुल्क लावले असतानाही विकासदराची प्रगती

Advertisement
Tags :

.