केस विकून बख्खळ कमाई
मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर येथील महिलांनी भरपूर कमाई करण्याचा एक वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. येथील महिला चक्क आपले केस विकून पैसा कमावतात. यामुळे स्थानिक लोकांना एक लाभदायक रोजगारही उपलब्ध झाला आहे. या शहरातील अनेक महिला या व्यवसायात आहेत. काही महिला केसांच्या मोबदल्यात भांडी किंवा इतर नित्योपयोगी वस्तूही स्वीकारताना दिसतात.
विशेष म्हणजे अशा केसांची किंमत सुकामेव्याच्या किमतीपेक्षाही जास्त असते. शिवाय दरवर्षी या किमतीत वाढ होत राहते. गेल्या वर्षी केसांचा दर प्रतिकिलो 2 हजार 500 रुपये इतका होता. यावर्षी तो 3 हजार रुपये झाला आहे. विशेषत: दसरा ते दिवाळी आणि अन्य सणांच्या काळात महिलांच्या केसांना मोठा भाव मिळतो. हे केस विकत घेणारे लोक घरोघरी फिरुन केस गोळा करतात. नंतर ते देशातील मोठ्या बाजारांमध्ये विकले जातात. जितके लांब केस असतील तितकी किंमत जास्त मिळते. केस कमी लांब असतील तर त्यांच्या बदल्यात वस्तू मिळतात. अलिकडच्या काळात केसांपासून निर्माण होणाऱ्या वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे महिलांच्या केसांना इतकी मोठी किंमत मिळू शकते.
यामुळे या शहरातील अनेक महिला आपले कापलेले केस साठवून ठेवतात आणि संधी मिळताच त्यांची विक्री करतात. दिल्ली, मुंबई, बेंगळूर आदी मोठ्या शहरांमध्ये या केसांपासून विविध वस्तू निर्माण करणारे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये केसांचे टोप, एक्स्टेन्शन किंवा अन्य फॅशनेबल वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तूंना देशातच नव्हे, तर विदेशांमध्येही मोठी मागणी असते. यामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे एक नवे साधन उपलब्ध होते. तसेच काही प्रमाणात पर्यावरणाचे संरक्षणही होते, असे जाणकारांचे मत आहे.