शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला
निफ्टी निर्देशांकही 388 अंकांनी घसरणीत, सर्व क्षेत्रे नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार मोठ्या प्रमाणात घसरलेला पहायला मिळाला. चीनमध्ये आलेल्या नव्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे डॉलरची घसरण, कच्च्या तेलांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे शेअर बाजार घसरला होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1258 अंकांनी कोसळत 77964 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 388 अंकांनी कोसळत 23616 स्तरावर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास 1778 अंकांनी घसरणीत राहिला. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 समभाग घसरणीत राहिले. निफ्टीतील 50 पैकी 43 समभागांमध्ये घसरण पहायला मिळाली. सर्व क्षेत्राचे निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले. यातही पीएसयू बँक निर्देशांक सर्वाधिक 4 टक्के घसरणीत होता. या पाठोपाठ रियल्टी 3.16 टक्के, धातू 2.71 टक्के आणि ऑटो निर्देशांक 2.18 टक्के घसरणीत दिसून आला.
चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने थैमान घातले असून त्याची चिंता भारतातही पसरत आहे. तीन संशयीत रुग्ण आढळल्याचे दिसून आले असून बाजारात विदेशी गुंतवणुकदारांकडून सातत्याने विक्रीवर भर दिला जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच असून दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर सोमवारी पहायला मिळाला.
हे समभाग घसरणीत
निफ्टीत अपोलो हॉस्पिटल, टाटा कंझ्युमर्स, टायटन आणि एचसीएल टेक्नॉलॉजी यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. दुसरीकडे इन्फोसिस, ब्रिटानिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, सिप्ला, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, एशियन पेंटस, एनटीपीसी, स्टेट बँक, कोल इंडिया, एसबीआय लाईफ इन्सुरन्स, बीपीसीएल यांचे समभाग घसरणीत राहिले. एनएसडीएल यांच्या आकडेवारीनुसार जानेवारीत आतापर्यंत 4285 कोटी रुपयांचे समभाग विक्री करण्यात आले आहेत. तिसऱ्या तिमाहीतील निकालानंतर एचडीएफसी बँकेचे समभाग 2 टक्के घसरत 1714 रुपयांवर घसरले. या आठवड्यामध्ये तिसऱ्या तिमाहीचे जवळपास 36 कंपन्यांचे निकाल घोषित होणार आहेत. त्यावर बाजारात प्रतिसाद पाहायला मिळणार आहे. टीसीएस, डी मार्ट यांचा यामध्ये समावेश असेल.