सोमवारी भारतीय शेअरबाजारात मोठी पडझड
सेन्सेक्स 1272 अंकांनी घसरला : रिलायन्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअरबाजार नफावसुली व मध्यपूर्वेतील अशांततेच्या कारणास्तव 1200 पेक्षा जास्त अंकांनी कोसळलेला दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रिज आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरलेले होते. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1272 अंकांनी घसरत 84,299 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकही 368 अंकांनी घसरत 25,810 अंकांवर बंद झाला. सकाळी निफ्टी 117 अंकांच्या नुकसानीसोबत 26061 अंकांवर तर सेन्सेक्स 363 अंकांच्या तोट्यासोबत 85209 अंकांवर खुला झाला होता. भूराजकीय अस्थिरता आणि नफावसुली या दोन कारणास्तव शेअरबाजारात सोमवारी घसरण दिसून आली.
हे समभाग घसरणीत
बाजारात घसरण व्हायला रिलायन्स इंडस्ट्रिज आणि अॅक्सिस बँक यांचे 3 टक्के घसरलेले समभागही कारणीभूत होते. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग सर्वाधिक 3.25 टक्के घसरत 2953 रुपयांवर बंद झाले. यानंतर अॅक्सिस बँकेचे समभाग 3.22 टक्के घसरत 1232 रुपयांवर बंद झाले होते. महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग 2.79 टक्के घसरत 3095 रुपयांवर, आयसीआयसीआय बँकेचे समभाग 2.58 टक्के घसरत 1273 रुपयांवर बंद झाले होते. नेस्ले इंडियाचे समभाग 2.04 टक्के घसरले होते.
हे समभाग तेजीत
दुसरीकडे जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग 2.85 टक्के वाढत 1030 रुपयांवर तर एनटीपीसीचे समभाग 1.45 टक्के वाढत 443 रुपयांवर बंद झाले. यासोबत टाटा स्टीलचे समभाग 1.21 टक्के, एशियन पेंटस् 0.56 टक्के वाढलेले पाहायला मिळाले.
3 क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत
सोमवारी निफ्टी मेटल निर्देशांकात मोठी खरेदी पाहायला मिळाली. 1.33 टक्के वाढत बंद झाला. निफ्टी मीडिया आणि स्मॉलकॅप-250 निर्देशांक तेजीत होते.