अमेरिकेत शेअरबाजारांची मोठी घसरण
टॅरीफ धोरणाचा परिणाम, प्रसिद्ध कंपन्यांची हानी
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेमधील शेअरबाजरांची मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. याचा फटका मायक्रोसॉफ्टसह अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांना बसून त्यांच्या बाजारी भांडवलाचीही घसरण झाली. अमेरिकेच्या टॅरीफ धोरणाचा हा परिणाम असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. भारताच्या प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री नंतर आणि अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार तेथील सोमवारी सकाळपासून शेअरबाजारांचे निर्देशांक ढासळण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अमेरिकेचा सर्वात मोठा शेअरबाजार डाऊ जोन्समध्ये 900 अंकांची घसरण झील आहे. तर नॅसडॅक या शेअरबाजारात 2022 पासूनची सर्वात मोठी घसरण नोंद झाली आहे. नॅसडॅक हा मुख्यत: तंत्रवैज्ञानिक कंपन्यांचा शेअर बाजार आहे. त्याची एका दिवसात 4 टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या टेक कंपन्यांना मोठा फटका बसला असून मायक्रोसॉफ्टच्या बाजारी भांडवलमूल्यात तब्बल 7500 कोटी डॉलर्सची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेने आपले नवे करधोरण लागू करण्याची घोषणा केल्यापासून ही दुसरी मोठी घसरण आहे. या घसरणीसंदर्भात तज्ञांनी भिन्न भिन्न मते व्यक्त केली आहेत. एस अँड पी 500 या निर्देशांकाची घसरण 9 टक्के झाल्याची नोंद झाली आहे. या घसरणीचा परिणाम आणखी काही दिवस राहील, अशी शक्यता आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाशी संबंधिक कंपन्यांचे समभागही घसरले आहेत. या घसरणीमुळे अमेरिकन शेअरबाजाराची एकंदर 1 लाख कोटी डॉलर्सची हानी झाली आहे.
घसरणीचे कारण
अमेरिकेच्या नव्या करधोरणानुसार आयात वस्तूंवरील करांमध्ये वाढ केली जाणार आहे. अनेक देशांच्या वस्तूंवर हा कर वाढविला जाणार आहे. या देशांनीही अमेरिकेच्या वस्तूंवरील करांवर अशीच वाढ केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेअरबाजारांमध्ये अनिश्चितता पसरली असून ही घसरण होत आहे, असे मत अनेक शेअरबाजार आणि गुंतवणूक तज्ञांनी व्यक्त केले आहे. ही अनिश्चितता दूर होईपर्यंत तेथील शेअरबाजारांमध्ये अस्थिरता राहणे शक्य आहे.
भारतावर परिणाम नाही
अमेरिकेतील या घसरणीचा आशियातील अनेक शेअरबाजारांवर परिणाम दिसून आला. जपान, चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियामधील शेअरबाजारांची काही प्रमाणात घसरण झाली. तथापि, भारतातील सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांत तुलनेने स्थिर राहिले. सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 12 अंकांनी घसरला असून निफ्टीमध्ये 37 अंकांची वाढ दिसून आली आहे. अमेरिकेच्या घसरणीचा तत्काळ परिणाम भारतावर झाला नाही कारण भारताची अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि भक्कम असल्याचे दिसते, असे विश्लेषण अनेक तज्ञांनी केले आहे.