मोठी घडामोड! वादळानंतर तुषार दोशी सातारा पोलीस मुख्यालयात दाखल; पुन्हा स्वीकारला पदभार
एसपी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश मागे?
सातारा- सातारा जिल्हा परिषद निवडीवेळी मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीचे प्रकरण राज्यभर गाजले. त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. यावर उपसभापतींनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. यावर राजकारण चांगलेच तापले असताना निलंबनाचे आदेश मागे घेतल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक श्रीराम नवमीच्या दिवशी पोलीस मुख्यालयात दाखल झाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या तक्रारीनंतर विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोडे यांनी दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. मात्र, विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या विनंतीनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे दोशी मुख्यालयात रुजू होणार का याबाबत विविध तर्कवितर्काना उधाण आले होते.
दरम्यान, तुषार दोशी हे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे वार्षिक वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. दरवर्षी ३१ मार्चपूर्वी आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते.
त्याचअनुषंगाने त्यांनी ही तपासणी पूर्ण केली. तपासणीनंतर गुरुवारी ते सातारा येथे पोलीस मुख्यालयात दाखल झाले असून त्यांनी पुन्हा आपल्या नियमित कामकाजाला सुरुवात केली आहे.
या घडामोडींविषयी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, दोशी यांनी "ही बाब वरिष्ठ पातळीवरील आहे" असे सांगत भाष्य करण्यास नकार दिला. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील पुढील निर्णय आणि हालचालींकडे लक्ष लागले आहे.