गणपतीपुळे देवस्थानचा मोठा निर्णय! भाविकांसाठी महाप्रसादाची वेळ वाढवली
गॅस टंचाईत भाविकांच्या भोजनासाठी गणपतीपुळे संस्थान सरसावले
रत्नागिरी -पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र व्यावसायिक गॅसच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खिचडी प्रसाद भोजनाची वेळ एक तासाने वाढवली आहे.
देवस्थानने भाविकांच्या सोयीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले असून आता दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.४५ वाजेपर्यंत मोफत महाप्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. इराणमधील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पुरवठा बंद असल्याने गणपतीपुळे परिसरातील अनेक हॉटेल्स आणि खानावळी सद्यस्थितीत बंद पडल्या आहेत.
यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची गैरसोय होत आहे. भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन देवस्थानच्या पंचकमिटीने सामाजिक बांधिलकी जपत दररोज दिल्या जाणाऱ्या मोफत खिचडी प्रसाद भोजनाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून या संकटाच्या काळात जास्तीत जास्त भाविकांना अन्नाचा लाभ घेता येईल. हॉटेल व्यावसायिक अडचणीत असताना देवस्थानने उचललेले पाऊल भाविकांसाठी आधार ठरत आहे. अधिकाधिक भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान पंच कमिटीने केले आहे.
प्रसाद लाडू विक्री बंद
गॅसटंचाईचा परिणाम देवस्थानच्या इतर विभागांवरही झाला आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे संस्थानमार्फत केली जाणारी प्रसिद्ध 'प्रसाद लाडू'ची विक्री सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा तुटवडा असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे समजते.