कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवाद्यांचे मोठे कारस्थान उघड

06:50 AM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन डॉक्टरांसह 7 जणांना अटक ; 2 रायफल,2 पिस्तूल जप्त; दोन दहशतवादी संघटनांशी संबंध

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर, फरिदाबाद

Advertisement

देशात मोठा घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट उघडकीस आला आहे. एका मोठ्या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिसांनी एका आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. हे नेटवर्क जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद सारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी जोडलेले आहे. आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात दोन डॉक्टरांचा समावेश आहे. डॉक्टर आदिल आणि मुझम्मिल अहमद यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल 2,900 किलो स्फोटके जप्त करत मोठी कारवाई केली आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांनी रविवारी फरिदाबादमधून 360 किलो स्फोटके जप्त केली. त्याच अनुषंगाने दुसऱ्या दिवशीही हे छापासत्र कायम ठेवल्यानंतर आणखी आरडीएक्सचे मोठे घबाड तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. सोमवारी आणखी एका छाप्यात सुरक्षा दलांनी त्याच भागातून 2,563 किलो स्फोटके जप्त केली. सुरुवातीला हरियाणातील फरिदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरातून 360 किलो स्फोटके (संशयास्पद अमोनियम नायट्रेट) जप्त करण्यात आली, तसेच एक असॉल्ट रायफल आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला होता. अटक केलेल्या डॉक्टरचे नाव मुझम्मिल अहमद असे आहे. तो फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात शिकवत होता. तो मूळचा पुलवामा येथील कोइलचा रहिवासी असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी  दिली.

अनेक राज्यांमध्ये एकाचवेळी छापे

जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये एकाचवेळी छापे टाकले. फरिदाबादमध्ये हरियाणा पोलीस आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी चार तासांची शोधमोहीम राबवली. तसेच फतेहपूर तागा गावात छापा टाकला. हरियाणातील फरिदाबादच्या धौज परिसरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेहपूर गावात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तेथील एका घरातून पोलिसांनी 2,563 किलो संशयास्पद स्फोटके जप्त केली. हा साठा डॉ. मुझम्मिल याच्या ताब्यात असलेल्या भाड्याच्या खोलीत सापडल्याचे सांगण्यात आले. या घरात खाली सिमेंटचे दुकान असून वरच्या मजल्यावर भाड्याने घेतलेली खोली होती. तपासणीवेळी सध्या या खोल्या बंदावस्थेत असल्याचे आढळून आले.

भाड्याच्या घराचे स्फोटकांच्या गोदामात रुपांतर

डॉ. मुझम्मिल अहमद याने फतेहपूर तगा गावात एका मौलानाकडून घर भाड्याने घेतले होते. पोलिसांनी सोमवारी सकाळी मौलानाला ताब्यात घेतले. या घरात स्फोटके आणि शस्त्रांचा मोठा साठा लपवण्यात आला होता. तपासात एके-56 आणि एके-क्रिंकोव्ह रायफल्स, दोन पिस्तूल (चायनीज स्टार आणि बेरेटा), दारूगोळा आणि संपूर्ण आयईडी बनवण्याची यंत्रणा जप्त करण्यात आल्याचे उघड झाले. यावरून हे नेटवर्क मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट होते. अजूनही श्रीनगर, अनंतनाग, गंदरबल, शोपियान, फरिदाबाद आणि सहारनपूर येथे संयुक्त शोध घेण्यात येत आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी डॉ. आदिल अहमद याला सहारनपूर (उत्तर प्रदेश) येथून अटक केली. तो काश्मीरमधील अनंतनाग येथील रहिवासी आहे. आदिल अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) प्रॅक्टिस करत होता. त्याने 2024 मध्ये तिथून राजीनामा दिल्यानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये प्रॅक्टिस करू लागला. डॉ. आदिल अहमदच्या चौकशीतून डॉ. मुझम्मिल याचे नाव पुढे आले होते. डॉ. मुझम्मिल याने तीन महिन्यांपूर्वी फरिदाबादमधील धौज गावात एक खोली भाड्याने घेतली होती. तो तिथे राहत नव्हता, परंतु तो या खोलीचा वापर केवळ सामान ठेवण्यासाठी करत होता.

आंतरराष्ट्रीय नेटवर्क

अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून एकूण 2,900 किलो आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आल्याचे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले. हे मॉड्यूल जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि अन्सार गजवत-उल-हिंद (एजीयूएच) सारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी जोडलेले होते. पोलिसांनी सांगितले की आरोपी परदेशी हँडलर्सच्या सूचनांनुसार काम करत होते आणि सोशल मीडिया आणि एक्रिप्टेड चॅनेलद्वारे दहशतवादी कारवाया करत होते. या दहशतवादी टोळीने एक्रिप्टेड चॅनेलद्वारे निधी हस्तांतरण, शिकवण आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला. सामाजिक आणि व्यावसायिक नेटवर्कद्वारे निधी उभारला जात होता आणि तपास आता पैशाच्या व्यवहारांपर्यंत पोहोचला आहे.

संयुक्त छापासत्रात कारवाईचा धडाका

सोमवारी सकाळपासून फरिदाबाद पोलीस आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे छापासत्र सुरू केले. फरिदाबादचे पोलीस आयुक्त सत्येंद्र कुमार यांनी पत्रकार परिषद घेत छापासत्राविषयी माहिती दिली. ही कारवाई अजूनही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात स्फोटके सापडलेले घर डॉ. मुझम्मिल याने भाड्याने घेतले होते असे आढळून आले आहे. सदर घर एका मौलानाचे असून त्याला पोलिसांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतले. जप्त केलेले साहित्य कोणत्या उद्देशाने वापरायचे होते आणि ते कोणाच्या नेटवर्कशी जोडलेले आहे याचाही पोलीस तपास करत आहेत.

प्रकरण काय आहे?

जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रथम श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पोस्टर लावल्याबद्दल एका डॉक्टरला अटक केली होती. गेल्या 15 दिवसांत पोलिसांनी तीन दिवसांत अनेक छापे टाकल्यानंतर हरियाणातील फरिदाबाद आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे छापे टाकले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे दोघांना अटक करण्यात आली. तेथील एका घरातून 360 किलो अमोनियम नायट्रेट, दोन रायफल आणि अनेक पिस्तूल जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे, सोमवारी दुसऱ्या घरावर टाकलेल्या छाप्यात 2,363 किलो स्फोटके आढळली.

अटक केलेले मुख्य संशयित

आरिफ निसार दार साहिल, नौगाम, श्रीनगर

यासिर-उल-अशरफ, नौगाम, श्रीनगर

मकसूद अहमद दार शाहीद, नौगाम, श्रीनगर

मौलवी इरफान अहमद, शोपियान

जमीर अहमद अहंगर मुतलाशा, वाकुरा, गंदरबल

डॉ. मुझम्मिल अहमद गनई मुसायेब, कोइल, पंपोर

डॉ. आदिल, वानपोरा, कुलगाम, जम्मू काश्मीर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article