अकरा वर्षांमध्ये देशात मोठे परिवर्तन
पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, तिसऱ्या रालोआ काळातील प्रथम वर्षाची झाली सोमवारी पूर्ती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्षाची पूर्ती झाली आहे. यानिमित्त आज मंगळवारी ‘भारत मंडपम’ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रात देशात व्यापक परिवर्तन घडले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली असून संरक्षण व्यवस्थाही अधिक प्रभावशाली बनली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
9 जून 2024 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून शपथ घेतली होती आणि सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी देशाची सूत्रे हाती घेतली होती. या दिवसाला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारची 11 वर्षे 26 मे 2025 या दिवशी पूर्ण झाली होती. या निमित्त त्यांनी गेल्या 11 वर्षांमधील कार्याचा आढावा घेतला. आर्थिक, सामाजिक आणि सामरिक अशा सर्व महत्वाच्या क्षेत्रांमध्ये या 11 वर्षांमध्ये भारताने मोठी सकारात्मक प्रगती केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात गेल्या अकरा वर्षात केलेल्या प्रगतीचा प्रचार करण्याच्या निमित्ताने 10 आणि 11 जून या दोन दिवसात जिल्हा पातळीवर भाजप नेत्यांकडून पत्रकार परिषदांचे आयोजनही करण्यात आले आहे.
सामाजिक न्यायासाठी अग्रेसर
आज केंद्रीय मंत्रिमंडळात अन्य मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या मंत्र्यांचे प्रमाण साठ टक्के आहे. स्वातंत्र्यानंतर आजवर कधीच देशाच्या निर्णय प्रक्रियेत आणि धोरण निर्मितीत या वर्गांना एवढे मोठे स्थान देण्यात आले नव्हते. आमचे सरकार सामाजिक न्यायाच्या संदर्भात संवेदनशील असल्याने आम्ही असे प्रतिनिधित्व या वर्गाला दिले आहे. सबका विकास, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या महत्वाच्या तत्वावर आम्ही आमचे प्रशासन चालविल्याने प्रत्येक क्षेत्रात आज प्रशंसनीय प्रगती झाल्याचे दिसून येते. भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या देशेने आम्ही वेगाने अग्रेसर आहोत. स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत हे ध्येय पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्र्यांकडून समाधान
भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येक मंत्र्याने यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या विभागाच्या उपलब्धींची माहिती पाठविली आहे. सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर, कुशल आणि संवेदनशील नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पास्वान यांनी त्यांच्या संदेशात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात प्रगती आणि विकास यांचे नवे युग अवतरले आहे, अशी भलावण केली आहे. इतर मंत्र्यांनीही त्यांच्या अशाच भावना व्यक्त केल्या.
सर्वसमावेशक सरकार
या 11 वर्षांमध्ये केंद्र सरकारने आपल्या सर्वसमावेशकत्वाचा प्रत्यय प्रत्येक वेळी आणून दिला. महिला, युवक आणि शेतकरी यांच्या सबलीकरणासाठी योजना आणल्या आणि त्या यशस्वी करुन दाखविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘लोकहित प्रथम’ या धोरणामुळे जनतेचा विश्वास या सरकारने मोठ्या प्रमाणात प्राप्त केला, अशा शब्दांमध्ये नितीन गडकरी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
होईल सुवर्णाक्षरांनी नोंद : भाजपाध्यक्ष नड्डा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने देशाची जी प्रगती घडवून आणली, त्या प्रगतीची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी होणार आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी व्यक्त केला आहे. रालोआ सरकारच्या आतापर्यंतच्या सलग 11 वर्षांच्या कालखंडात या सरकारने देशासमोरची सर्व आव्हाने निडरपणे आणि निष्ठेने स्वीकारली. त्यामुळे देशाची मोठी प्रगती झाली, असे प्रतिपादन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.