पणजी शहरासह परिसरातील वाहतुकीत आज मोठा बदल
पणजी : गुरुवार 20 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त पणजीत आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट मिरवणुकीची रंगीत तालीम आज मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी दयानंद बांदोडकर मार्गावरील जुने सचिवालय ते कला अकादमीपर्यंतचा रस्ता दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 18 व 20 नोव्हेंबर या दोन्ही दिवसांसाठी पणजी शहरात येणारी वाहतूक जुन्या सचिवालयाकडून दयानंद बांदोकर पुतळ्याजवळून वळवण्यात येणार आहे आणि ती चर्च चौकातून पुढे जाणार आहे. बांबोळीहून पणजी शहरात येणारी वाहने नवीन मळा पुलावरून तसेच फोर पिलार जंक्शन-भाटलेमधून जाऊ देण्यात येणार आहेत. चित्ररथ मिरवणूक सुरू झाल्यानंतर ती संपेपर्यंत शहरी प्रवासी बसना अनुमती देण्यात येणार नाही.
रायबंदर येथून पणजी शहरात येणारी वाहने रायबंदर कॉजवे-मेरशी अंडरपास येथून वळवली जाणार आहेत. 16 व 20 नोव्हेंबरसाठी पणजीतून बाहेर जाणारी वाहने कांपाल बाल गणेश-कला अकादमीकडून सांतइनेज जंक्शन-अग्निशामक मुख्यालयाकडून 18 जून मार्गाने वळवली जाणार आहेत. रूअ-द-ओरेमकडून येणारी वाहने सोना हॉटेलजवळून उजवीकडे जाण्यासाठी वळवण्यात येतील. दोन्ही दिवस सकाळी 7 ते रात्री 10 वा. पर्यंत पणजी शहरात अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पणजीतून रायबंदरकडे जाणारी वाहने दिवजा सर्कल-मेरशी सर्कल बायपास रोडमार्गे वळवली जाणार आहेत. जोस फाल्काव रोज, ज्यो कॅस्ट्रो रोड, मॅच कॉर्नर ते कासा इंटरनॅशनल (एमजी रोड), काकुलो आयलंड ते सांतइनेज जंक्शन, चर्च चौक ते कोर्तीन, डाऊन द रोज पब ते मॅच कॉर्नर हे भाग दोन्ही दिवसांसाठी नो पार्कींग झोन करण्यात आले आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना गुरुवारी अर्धा दिवस सुट्टी
येत्या गुरुवारी दि. 20 नोहेंबर रोजी दुपारनंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन तसेच चित्ररथ मिरवणूक होणार असल्याने पणजी शहरातील सरकारी कार्यालये, स्वायत्त संस्था, महामंडळे यांना अर्धा दिवस सुट्टी राज्य सरकारने जाहीर केली आहे. सर्वसाधारण प्रशासन खाते (जीएडी) 1 च्या अवर सचिव श्वेता हरमलकर यांनी तसा आदेश जारी केला आहे. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच लोकांना अडचणी येऊ नयेत, मिरवणूक सुरळीत व्हावी, यासाठी सुट्टी देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.