हर्णेत 'कटलफिश'चा मोठा कॅच
दापोली :
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात सध्या कटलफिशने चांगला भाव खाल्ला आहे. कटलफिशची आवकही बंपर झाल्याने अनेक कारणांनी मेटाकुटीस आलेल्या मच्छीमार बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे.
एलईडी, पर्ससीन, परराज्यातील नौकांमुळे येथील मच्छीमार बांधव आधीच मेटाकुटीस आले आहेत. त्यात डिझेलचे वाढलेले दर, खालाशांचे वाढलेले पगार यामुळे त्यांचे खर्चाचे गणित बिघडून गेले आहे. त्यातच हवामानातील झालेल्या बदलामुळे नियमित मिळणारी मच्छीदेखील मिळणे कठीण झाले आहे. त्यातच सध्या हर्णे बंदरात कटलफिश मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. या कटलफिश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या माशाला पूर्वी २१० ते २०० रुपये किलो दर मिळत होता. मात्र आता या माशाला ३०० ते ३३० असा विक्रमी दर मिळत आहे.कटलफिश या माशाला परदेशात मोठी मागणी असते. यामुळे हा मासा पूर्णपणे निर्यात केला जातो. यामुळे आपल्या देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. सध्या हर्णे बंदरात कटलफिश मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमार बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे.