अरविंद केजरीवालांना मोठा झटका
पंतप्रधान मोदींच्या पदवीचे प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून केलेल्या टिप्पणीप्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक असलेल्या केजरीवालांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुजरात विद्यापीठाकडून दाखल मानहानी प्रकरणी केजरीवाल विरोधात सत्र न्यायालयाने समन्स जारी केला होता. हा समन्स रद्द करण्यासाठी केजरीवालांनी प्रथम उच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अशाप्रकारची याचिका आप खासदार संजय सिंह यांनीही दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली होती. आम्ही हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही, एक याचिकाकर्ता आमच्याकडे आला होता आणि त्याची याचिका फेटाळण्यात आली होती असे न्यायाधीश ऋषिकेश रॉय आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. संजय सिंह यांनी केलेले वक्तव्य वेगळे होते असा युक्तिवाद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला, जो खंडपीठाने अमान्य केला.
यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने समन्सला स्थगिती देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाकडून निराशा पत्करल्यावर केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने केजरीवालांना आता गुजरातच्या न्यायालयासमोर हजर रहावे लागणार आहे.
केजरीवाल आणि संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून गुजरात विद्यापीठाच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडून केजरीवाल आणि संजय सिंह विरोधात मागील वर्षी एप्रिलमध्ये समन्स जारी करण्यात आला होता. विद्यापीठासंबंधी आम्ही कुठलेच वक्तव्य केले नसल्याने मानहानीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा युक्तिवाद दोन्ही नेत्यांनी उच्च न्यायालयासमोर केला होता. केजरीवाल आणि संजय सिंह यांच्या टिप्पणीमुळे आमच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचा दावा गुजरात विद्यापीठाने केला होता.