For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका

06:13 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका
Advertisement

आमदार, नगरसेवक, माजी मंत्र्यासह अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आनंद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत बसपमध्ये प्रवेश केला होता. आनंद आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत आप आमदार कर्तार सिंह तंवर, रत्नेश गुप्ता, सचिन राय, माजी आमदार वीणा आनंद आणि आप नगरसेवक उमेश सिंह फोगट यांनीही भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. या नेत्यांनी दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी राजकुमार आनंद यांनी आम आदमी पक्षाच्या भ्रष्टाचारावर नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमवेत पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीत पराभव

राजकुमार आनंद यांनी नवी दिल्ली मतदारसंघात बसपच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना केवळ 5629 मते मिळाली होती. या मतदारसंघात भाजपच्या बांसुरी स्वराज यांनी 78,370 मतांनी विजय मिळविला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती राहिले होते. पटेल नगरचे माजी आमदार असलेले राजकुमार आनंद हे केजरीवालांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये समाज कल्याण आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमात विषयक मंत्री होते. भ्रष्ट पक्षात राहण्याची इच्छा नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाबाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

प्राप्तिकर विभागाचा छापा

जुलै 2016मध्ये कर्तार सिंह तंवर यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. प्राप्तिकर विभागाने छतरपूरचे आप आमदार कर्तार सिंह तंवर यांच्या दिल्लीतील फार्म हाउस आणि कार्यालयातही झडती घेतली होती.  कर्तार सिंह तंवर यांच्या 20 कंपन्यांच्या तपासाच्या कक्षेत होत्या. शासकीय नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यावर तंवर यांनी मालमत्तेच्या व्यवहारांमधून कोट्यावधी रुपये कमाविल्याची तक्रार प्राप्तिकर विभागाला प्राप्त झाली होती.

हिमाचलमधील नेत्यांचे पक्षांतर

हिमाचल प्रदेशचे आप प्रभारी रत्नेश गुप्ता आणि सहप्रभारी सचिन राय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे हिमाचल प्रदेशात स्वत:चा प्रभाव निर्माण करू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आम आदमी पक्षाने हिमाचल प्रदेशात भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Tags :

.