Pandharpur theft case | पंढरपूर पोलिसांची मोठी कामगिरी! १८ लाखांची घरफोडी करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश
पंढरपुरात घर देण्याच्या बहाण्याने चोरी
पंढरपूर - येथील गोपाळपूर येथे स्वस्तात घर मिळवून देण्याचा बहाणा करून घरात प्रवेश करत चोरी करणाऱ्या टोळीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी १२ तासांत पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे.याप्रकरणात चार महिला, एका पुरुषाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार आहेत. आरोपींकडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहितीपंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. बाय. मुजावर यांनी दिली.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील नंदाबाई नामदेव भुई यांच्या घरी १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एक महिला आली. तिने दरवाजा ठोठावल्यावर नंदाबाई भुई यांनी दरवाजा उघडला. संबंधित महिलेने कमी किमतीत घर उपलब्ध करून देतो, असे सांगत फिर्यादींना बोलण्यात गुंतवून ठेवले.
याच दरम्यान इतर तीन महिला व एक पुरुषाने घरात प्रवेश करून कपाटातील १२ तोळे सोने, ३०० ग्रॅम चांदी, रोख ३ लाख ७८ हजार रुपये व एकमोबाईल असा सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात येताच नंदाबाई भुई यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या १२ तासांत आरोपींचा शोध घेत तिघांना अटक केली. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सर्व आरोपी गोपाळपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई अधिकारी उपविभागीय पोलीस डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी केली.