बिद्री निवडणूक : महालक्ष्मी आघाडी पॅनलच्या घोषणेत राडा! सभासदांचा बहिष्कार टाकण्याचा इशारा
बिद्री कारखान्याच्या निवडणूकसाठी सत्ताधारी पॅनेलकडून आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना नरतवडे गावच्या सभासदांनी आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर न झाल्याने बराच गोंधळ घातला. तसेच ऐनवेळी आपल्या उमेदवाराचे नाव डावलल्याने नाराज होत त्यांनी सभात्याग करून विरोधी गटाचे प्रकाश आबीटकर यांच्या जयघोष करत बाहेर पडले.
हे पहा VIDEO >>> महालक्ष्मी आघाडी पॅनलच्या घोषणेत राडा; सभासदांचा बहिष्कार टाकण्याचा इशारा
बिद्री कारखान्यासाठी निवडणूका लागल्या असून त्यासाठी माजी आमदार के.पी. पाटील गटाने मोर्चेबांधणी केली आहे. सत्ताधारी के.पी. पाटील गटाच्या महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी पॅनेलला पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील गटाची साथ लाभली आहे. आज महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. यावेळी पॅनेलचे अध्यक्ष के.पी. पाटील यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हजर होते.
नरतवडे गावच्या फत्तेसिंग पाटील यांचे नाव महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांच्या यादीत होते. तसे नावही के. पी. पाटील यांनी जाहीर केले. पण नंतर हसन मुश्रीफ यांनी फत्तेसिंग पाटील यांचे नाव चुकुन जाहीर झाले असून त्यांना आता उमेदवारी देता येणार नाही. पण त्यांना निवडणुकीनंतर स्विकत म्हणून घेण्यात येईल. असे सागून सभासदांची दिलगीरी व्यक्त केली.
नाव मागे घेतल्याचे कळताच नरतवडे गावच्या सभासदांनी सभागृहात एकच गर्दी केली. एकदा उमेदवारी जाहीर झाली असताना ती मागे घेतली गेलीच कशी असा सवाल करून फत्तेसिंह पाटील यांचे कार्यकर्ते नाराज झाले. सभागृहात एकच गोंधळ घालायला सुरवात केली. यावर पालकमंत्र्यानी आणि आमदार सतेज पाटील यांनी सभासदांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पण सभासद काही ऐकायला तयार नव्हते. यावेळी नाराजी व्यक्त करून सभासदांनी सभागृहाचा त्याग करून बाहेर पडले. तसेच आपल्या गावावर निवडणुकीच्या काळात नेहमीत अन्याय होतो. त्यामुळे कारखान्याच्या निवडणूकीमध्ये नरतवडे गाव मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र सभागृहातून बाहेर पडताना फत्तेसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पॅनेलचे प्रमुख प्रकाश आबीटकर यांचा जयघोष केला. या प्रकारामुळे आज सभागृहामधील वातावरण काही काळ तापले होते.