For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आबिटकरांना 'बिद्री द्वेषाने' पछाडले आहे...कारखान्याच्या चौकशीमागे त्यांचाच हात! केपी पाटलांचा प्रकाश आबिटकरांवर थेट आरोप

06:16 PM Jun 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
आबिटकरांना  बिद्री द्वेषाने  पछाडले आहे   कारखान्याच्या चौकशीमागे त्यांचाच हात  केपी पाटलांचा प्रकाश आबिटकरांवर थेट आरोप
Advertisement

बिद्री कारखान्याच्या चांगल्या कारभारात  सातत्याने अडथळे आणणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकर यांना कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी दारूण पराभवाची धूळ चारली. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील पराभवाचा अंदाज आल्याने केवळ माझ्यावरील रागापोटी हजारो ऊस उत्पादकांची अर्थवाहिनी असलेल्या बिद्री कारखान्याला बदनाम करण्यासाठी आमदार जीवाचा आटापिटा करीत आहेत. 'रात्रीच्या अंधारात  बिद्री'ची झालेली चौकशी केवळ राजकीय हेतुने झाली असून हा त्यांचाच प्रताप आहे. असा थेट आरोप बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी आमदार प्रकाश आबीटकरांवर केला.

Advertisement

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने बिद्री कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशी झाल्याच्या पार्श्वभूमीवर  पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले.

पाटील म्हणाले,  तपासणी पथकाच्या तपासणीत अक्षेपार्ह असे काहीही नसल्याने बिद्रीचा कारभार पारदर्शी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या कारवाई पाठीमागे नुतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या मुदाळ गावातील स्वागतास माझी उपस्थिती व शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात माझा सहभाग हि प्रमुख कारणे आहेत. महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला. पण जनतेने ते मान्य केले नाही. त्यामध्ये माझा दोष नाही.

Advertisement

ते पुढे म्हणाले, आमदारकीच्या दहा वर्षांत बिद्रीच्या प्रगतीला अडथळा आणण्याचे काम आबिटकर यांनी केले आहे.बिद्री आणि के. पी. द्वेषाने ते पछाडलेले आहेत.  दिवस रात्र बिद्रीची प्रगती कशी रोखता येईल यासाठीच ते शासन दरबारी कार्यरत राहिले आहेत. सहवीज प्रकल्पात त्यांनी जमेल तेवढे अडथळे आणले.  सुमारे १२० कोटीच्या प्रकल्पाचे व सभासदांचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान केले. डिस्टलरी प्रकल्पाचे इरादापत्र व अन्य अनुशंगिक परवाने व लायसन्स कोणी अडविले हे साऱ्या महाराष्ट्राला समजले. उच्च कार्यक्षमतेच्या मिळालेल्या पुरस्कारांविषयी त्यांनी शंकांचे वादळ उठवीत खोटे नाटे आरोप केले. विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर तब्बल दोन वर्षे निर्णयाविना अडकवून ठेवल्या. टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर करून कुणी दबाव टाकला.  सभासद भागभांडवल १५ हजार रुपये करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरच आम्ही लागू केला; परंतु  आमदारांनी केवळ आमच्यावर आगपाकड केली व न्यायालयात दावा दाखल केला. नसलेल्या पावसाचे कारण पुढे करीत बिद्रीची  निवडणूक केवळ सत्तेच्या जोरावर पुढे ढकलली. पण सभासदांनी आमदारांना त्यांची योग्य जागा दाखवली.

यावेळी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले व अधिकारी उपस्थित होते.

आमदारांना पराभवाचे वेध
के पी पाटील म्हणाले,आता विधानसभेचे घोडे मैदान दूर नाही. जे बिद्रीच्या सभासदांच्या मनात आहे तेच राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदारच हा हिशोब चुकता करणार आहेत. आमदारांना याची जाणीव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या खोके भूमिके विषयी जनतेची खात्री झाल्यामुळे आपली अडचण होते की काय अशी भीती आमदारांना वाटल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्तेच्या जोरावर दडपशाहीने बिद्रीची तपासणी करण्यास भाग पाडले.  बिद्रीच्या सभासदांनी निवडणुकीत चोख उत्तर दिले आहेच.पण येत्या विधानसभा निवडणुकीतही अशीच लोकभावना असल्याने या लोक भावनेचा आदर सन्मान करण्यासाठी मी या रणांगणात निश्चितपणे उतरणार आहे.

Advertisement
Tags :

.